कर्मचाऱ्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाल्याची नवी मुंबई इंटकची तक्रार
नवी मुंबई : महापालिका परिवहन विभागाच्या घणसोली डेपो बस धुण्यासाठी पाण्यात सांडपाणी मिश्रीत पाणी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाल्याची लेखी तक्रार नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे निवेदनातून करताना या समस्येचे तात्काळ निवारण करण्याची मागणी केली आहे.
महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस नवी मुंबई कार्यक्षेत्रासह बदलापूर, ठाणे, पनवेल, उरणसह मुंबईत अनेक ठिकाणी प्रवासी सुविधा देत आहेत. या बसेस दिवसभर फिरल्यावर डेपोमध्ये धुण्यासाठी येत असतात. एकतर प्रवासामुळे बसेस गलिच्छ झालेल्या, धुळीने माखलेल्या असतात. महापालिका प्रशासनाच्या परिवहन विभागातील ठोक मानधनावरील कर्मचारी व रोजंदारीवरील कर्मचारी त्या बसेस धुण्याचे काम करत असतात. गेल्या काही दिवसापासून बसेस धुण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध होणारे पाणी खराब असून ते मल:मिश्रीत सांडपाणी आहे. परिवहन उपक्रमाच्या बसेस धुण्यासाठी मल:मिश्रीत पाणी येत असल्याने त्याच पाण्यात वावरुन कर्मचाऱ्यांना बसेस धुवाव्या लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाण्यात मल पाहून कर्मचाऱ्यांना उलट्या होत आहे. शौचाच्या पाण्याने बस धुवायच्या व त्याच बसमध्ये नवी मुंबईकरांनी प्रवास करायचा, ही संतापजनक बाब आहे. ही गोष्ट नवी मुंबईकरांना समजल्यास महापालिका प्रशासनाची प्रतिमा राज्यात मलीन होईल. कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्यावर मी स्वत: घणसोली डेपोत जाऊन खातरजमा केल्यावर सांडपाणी असल्याची खातरजमा केली आहे. त्या पाण्याचे व्हिडिओदेखील मी काढले आहेत. आपणास हवे असल्यास मी ते व्हिडीओ सादर करु शकतो, असे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
परिवहन उपक्रमातील घणसोली डेपोत बसेस धुण्यासाठी वापरण्यात येणारे मल:मिश्रीत पाणी आहे. या समस्येचे तातडीने निवारण करणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य व कर्मचाऱ्यांच्या जिविताला निर्माण झालेला धोका पाहता आपण तातडीने याप्रकरणाची चौकशी करुन मल:मिश्रीत पाणी या समस्येतून कर्मचाऱ्यांची मुक्तता करण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.