सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सिडको घेत असलेले ट्रान्सफर चार्जेस तात्काळ रद्द करण्याविषयी निवेदन दिले.
यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी फ्लॅट हस्तांतरण करताना प्रत्येक वेळी सिडको वसूल करत असलेले चार्जेस कसे बेकायदेशीर व जाचक आहेत, या विषयी तसेच यामुळे सदनिकाधारकांना मारावे लागणारे हेलपाटे, होणारा मानसिक त्रास व नाहक करावा लागणारा खर्च तसेच याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ सिडकोचे नूतन अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांना बोलावून तात्काळ याबाबत नवी मुंबईतील जनतेच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत प्रत्यक्ष सूचना दिल्या. विजय नाहटा यांच्या निवेदनावर लिखित स्वरूपात प्रस्तावाबाबत आदेश दिले. यावेळी नाहटा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष म्हात्रे, संचालक सुनील चौधरी, सहकार भारतीचे अध्यक्ष प्रमोद जोशी, भाजपा पदाधिकारी सतीश निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर,संजय भोसले व शहर प्रमुख विजय माने देखील उपस्थित होते. ट्रान्सफर चार्जेस रद्द होणेबाबत विजय नाहटा करीत असलेल्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले. विजय नाहटा यांच्या प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याबाबतच्या तसेच ट्रान्सफर चार्जेस रद्द करण्याच्या अभ्यासपूर्ण व सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त तसेच नवी मुंबईतील सर्व सदनिका धारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ते विजय नाहटा करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांना धन्यवाद देत आहेत.