सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने २ ऑक्टोबरपर्यंत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये शनिवारी, २१ सप्टेंबर या जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये खारफुटी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १६०० हून अधिक एनसीसी व स्काऊटचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वच ठिकाणी खाडीकिना-यांवरील खारफुटी भागातील कचरा साफ केला.
बेलापूर विभागात डोलया समुद्रेश्वर मंदीर पाणथळ भाग, नेरूळ विभागात सारसोळे जेट्टी १ व २ भाग, वाशी येथील सागर विहार किनारा, कोपरखैरणे येथील धारण तलाव सेक्टर १९ परिसर, घणसोली येथे सेक्टर १२ पामबीच रोड नजिकचा खाडीकिनारा परिसर, ऐरोली सेक्टर १० येथील जैवविविधता केंद्र कांदळवन परिसर याठिकाणी सागरीकिनारी खारफुटी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थी, नागरिकांनी समुद्राच्या पाण्यातून वाहत आलेला प्लास्टिक, कापड, थर्माकोल, कागद यांचा कचरा संकलित केला. यामध्ये चपलांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मोहीमेच्या विविध ठिकाणी भेट देत मोहीमेत सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत त्या त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी स्वच्छता व प्लास्टिकबंदीची सामुहिक शपथ ग्रहण केली. परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे यांनीही विविध ठिकाणी मोहीमेत सहभाग घेतला.
यामध्ये वाशी येथे सागरविहार सेक्टर ८ परिसरात राबविण्यात आलेल्या खारफुटी व परिसर स्वच्छता मोहीमेत ४५० हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत साधारणत: २ मेट्रिक टन कचरा संकलित केला. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक यांनी सहभागी होत नागरिक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. वाशी विभागाचे सहा.आयुक्त सागर मोरे, मुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी, स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या खारफुटी स्वच्छता मोहीमेत सागरी सीमा मंच, कर्मवीर ॲकेडमी, मॅनग्रुव्हज मार्शल या संस्थांच्या सदस्यांप्रमाणेच आयसीएल झुनझुनवाला कॉलेज सेक्टर ९, टिळक कॉलेज सेक्टर २८, वेस्टर्न कॉलेज सानपाडा, कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न महाविद्यालय सेक्टर १५ येथील एनएसएसचे विद्यार्थी सहभागी होते.
अशाच प्रकारे बेलापूर विभागात डोलाया समुद्रेश्वर खाडीकिनारी भागात सहा.आयुक्त शशिकांत तांडेल व स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून सागरी सीमा कोकण प्रांत संस्थेचे सदस्य तसेच स्टर्लिंग फार्मसी कॉलेज, स्टर्लिंग कॉमर्स कॉलेज, एसएस कॉलेज, एसके कॉलेज, एसी पाटील कॉलेज, विद्याप्रसारक विद्यालय अशा शैक्षणिक संस्थांमधील एनएसएस व एनसीसी विद्यार्थ्यांनी २५० हून अधिक संख्येने सहभागी होत येथील खारफुटी व परिसर स्वच्छ केला. मोहीमेमध्ये ११५ गोणी कचरा संकलित करण्यात आला.
नेरूळ विभागातील सारसोळे जेट्टी १ व २ याठिकाणी ३४० विद्यार्थी व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी उत्साही सहभाग घेत खारफुटी व परिसराची स्वच्छता केली. सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे, स्वच्छता अधिकारी श्री.अरूण पाटील यांच्या नियंत्रणाखाली विविध महाविद्यालयांचे एनएसएस विद्यार्थी व नागरिकांनी साधारणत: ७५० किलो कचरा गोळा केला.
कोपरखैरणे सेक्टर १९ येथील धारण तलावाच्या बाजूला असलेल्या खारफुटी परिसराची स्वच्छता मोहीम सहा. आयुक्त सुनिल काठोळे. स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली. यामध्ये लोकमान्य टिळक कॉलेज सेक्टर ४, डिव्हीएस कॉलेज सेक्टर १७ येथील एनसीसी विद्यार्थ्यांसोबतच धारण तलाव लाफ्टर क्लबच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग घेऊन परिसर स्वच्छता केली. येथे २५० हून अधिक नागरिकांनी सहभागी होत साधारणत: ५०० किलो कचरा संकलित केला.
सेक्टर १२ पामबीच रोड नजिकच्या खारफुटी परिसराची सफाई करताना पोलीस ॲकेडमी ग्रूप तसेच विविध महाविद्यालयांतील एनएसएसचे विद्यार्थी व नागरिक २०० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. घणसोली विभागाचे सहा.आयुक्त श्री.संजय तायडे, स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या खारफुटी परिसर स्वच्छता मोहीमेत साधारणत: ७०० कि.ग्रॅ.कचरा संकलित करण्यात आला.
ऐरोली सेक्टर १० येथील जैवविविधता केंद्रानजिकच्या कांदळवन क्षेत्रातील स्वच्छता मोहीम ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त श्री.शंकर खाडे व उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली. यामध्ये सुशिलादेवी देशमुख विद्यालय सेक्टर ४, मेहता कॉलेज सेक्टर १९ येथील एनएसएसचे विद्यार्थी तसेच दिवागाव आणि सेक्टर १० परिसरातील नागरिक २०० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. या मोहीमेत ३५० किलोहून अधिक कचरा संकलित करण्यात आला.
अशाच प्रकारच्या सखोल स्वच्छता मोहीमा तुर्भे विभागातील कोपरी तलाव स्वच्छ करीत सहा.आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या माध्यमातून तसेच दिघा विभागात परिमंडळ २ उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड व स्वच्छता अधिकारी प्रवीण थोरात यांच्या पुढाकारातून राबविण्यात आल्या. या ठिकाणीही नागरिक व विद्यार्थ्यांनी उत्साही सहभागी होत ही मोहीम यशस्वी केली.
‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत सहा विभागांत एकाचवेळी आयोजित करण्यात आलेल्या खारफुटी स्वच्छता मोहीमेला १६०० हून अधिक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता महापालिका मुख्यालयापासून पामबीच मार्गे टीएसचाणक्य पर्यंत जाऊन तिथून परत मुख्यालयापर्यंत येणाऱ्या ‘सायकल रॅली’ उपक्रमांत नागरिकांनी आपली सायकल घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व सायकलसारख्या इंधनमुक्त पर्यावरणशील वाहन वापराचा प्रचार करून आपला पर्यावरणशील दृष्टीकोन प्रसारित करावा असे आवाहन करण्यात येत आहे.