सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिडकोच्या खारघर-बेलापूर कोस्टल रोडविरोधात रविवारी स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करून हा रोड रद्द करण्याची मागणी केली. बेलापूर-खारघर हा कोस्टल रोड होता. पण आता त्याचा मार्ग बदलून तो नेरूळ, बेलापूरच्या आतील रहिवासी भागातून घेण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. बेलापूर सेक्टर १५ किल्ले गावठाण डीपीएस स्कूल भुयारी मार्ग ते नेरूळ जेट्टीपर्यंत बांधण्यात येणार आहे. यामुळे वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत अगोदरच विकसित बेलापूर सेक्टर १५ ला अवकळा येणार आहे. याला या भागातील स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून नागरिकांनी रविवारी बेलापूर येथे मानवी साखळी करून हा कोस्टल रोड रद्द करण्याची मागणी केली.
माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मानवी साखळी आंदोलन प्रसंगी उपस्थिती दर्शवून नागरिकांच्या मागणीला समर्थन दर्शविले. माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी मानवी साखळीची हाक दिली होती. माजी नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ यांच्यासह स्थानिक आबालवृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
विकासाला विरोध नसून या कोस्टल रोडसाठी ३० हजार झाडे तोडून पर्यावरणाची हानी मान्य नाही. या कोस्टल रोडमुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. बेलापूर आणि नेरूळ भागातील शांतता भंग पावणार आहे. पर्यावरण वाचवा, परिसरातील शांतता भंग होऊ देऊ नका अशा मागण्या रहिवाशांनी केल्या. याबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सिडकोच्या व्यवस्थापकीय-संचालक यांची भेट घेऊन नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन देणार असल्याची ग्वाही संदीप नाईक यांनी नागरिकांना दिली.