नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून वारंवार लेखी पाठपुरावा करुन, शिष्टमंडळाच्या माध्यमातून पालिका आयुक्तांसह परिवहन व्यवस्थापकांच्या सतत भेटी घेऊनही समस्या सुटतच नसल्याने परिवहन विभागातील रोजंदारी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून काळ्या फिती लावून कामास सुरुवात केली. महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून परिवहन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाच्या उदासिनतेचा निषेध करत सोमवारी काम केले.
कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या परिवहन विभागात काम करणाऱ्या रोजंदारी तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करुन त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून मागणी करताना सुविधा न मिळाल्यास २३ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करणार व त्यानंतर कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी काही दिवसापूर्वीच महापालिका प्रशासनाला दिला होता.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये रोजंदारी तसेच ठोक मानधनावर वाहक आणि चालक कार्यरत आहेत. प्रशासनामध्ये आज ना उद्या आपली सेवा कायम होईल या आशेवर हे कर्मचारी गेली १५ ते १६ वर्षे इमानेइतबारे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांची सेवा तर कायम झाली नाहीच, पण त्यांना पगारवाढही प्रशासनाने दिलेली नाही. त्यांच्या समस्यांचे निवारण होत नाही, त्यांना माफक प्रमाणावर सुविधा उपलब्ध करुन देण्यासही प्रशासनाने आजवर टाळाटाळच केली आहे. हे वाहक-चालक असलेले कर्मचारी आपल्या सेवेत दररोज हजारो प्रवाशांची ने-आण करण्याची सेवा करत आहेत. या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने मेडिक्लेमचीही सुविधा दिलेली नाही. रस्त्यावर प्रवासी सुविधा देताना बसला अपघात होऊन कोणी कर्मचारी घरी बसल्यास त्यास आजारपणावरील उपचाराचा खर्चही भेटत नाही. त्या कालावधीतला पगारही संबंधित कर्मचाऱ्यांना भेटत नाही. प्रशासनाकडे विचारणा केल्यास, तशी तरतूद नसल्याचे सांगण्यात येते. तशी तरतूद नसेल तर प्रशासनाने ती तरतूद करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी नियम, तरतूदी असतात, नियम-तरतूदीसाठी कर्मचारी नाही. जे प्रशासनाच्या प्रवासी सेवेचा डोलारा सांभाळतात, त्यांच्यासाठी तरतूद करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे आणि प्रशासन या जबाबदा रीपासून आपले अंग झटकू शकत नाही. घरातील कोणी आजारी पडल्यास कर्मचाऱ्याला नातेवाईकांकडे, मित्रांकडे पैसे उसने मागावे लागतात अथवा बाहेरुन व्याजाने पैसे काढावे लागतात. पाच वर्षे लोटली तरी पालिका प्रशासनाकडून या चालक-वाहकांना साधा ड्रेसही देण्यात आलेला नाही. अनेक चालक-वाहक फाटक्या कपड्यात काम करताना पहावयास मिळतात. स्वमालकीचे धरण व राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणना होणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनासाठी ही भूषणावह बाब नाही. २०१० मध्ये ठाणे कामगार आयुक्तांच्या आदेशाने आणि परिवहन समिती महासभेच्या ठरावानुसार परिवहन उपक्रमातील ठोक व रोजंदारीवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट कायम करणे आणि २०१० ठरावानुसार कनिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणे, त्यांच्या आरोग्यसुविधेसाठी मेडिक्लेमची सुविधा देणे, कामासाठी ड्रेस देणे, आजारपणाची भरपगारी रजा देणे या मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत सातत्याने महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे लेखी पाठपुरावा करत होते, शिष्टमंडळ घेऊन पाठपुरावा करत होते. समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देत होते. अखेरिला परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांना असुविधांमुळे होत असलेला त्रास नवी मुंबईकरांच्याही निदर्शनास यावा यासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून काळ्या फिती लावून सोमवारी सकाळीच आंदोलनास सुरुवात केली. एनएमएमटीच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळ्या फितीबाबत विचारणा केली असता, नवी मुंबईकरांना परिवहन कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाची माहिती मिळाली. कामगार नेते रविंद्र सावंत व युनियनचे पदाधिकारी पहाटेपासूनच कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते.
…. नवी मुंबई लाईव्ह.कॉम- कामगारांचे हक्काचे व्यासपिठ