Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सिडको विभागाशी निगडित विविध समस्या सोडवण्यासंदर्भात शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाठ यांची भेट घेतली. यावेळी नवी मुंबईतील आणि परिसरातील जमिनी फ्री होल्ड करण्यात याव्यात, तसेच जुन्या सिडकोच्या इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी, ज्या भूखंडावर मंदिर, देवालये उभी आहेत आणि त्या ठिकाणी प्रतिदिन पूजाअर्चा केली जाते. त्या ठिकाणचा भूखंड त्या मंदिराच्या संस्थेस नाममात्र दरात देण्यात यावा, मालमत्ता हस्तांतरित करताना लागणारे हस्तांतरित शुल्क रद्द करण्यात यावेत, नवी मुंबईतील पुनर्विकासाचे काम सुरू करत असताना सिडको, महापालिका, विमान प्राधिकरण यांच्याकडे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे लागते त्यामुळे पुनर्विकासाच्या कामात अनेक अडथळे येत असून विकासकाला आर्थिक भुर्दंड ही मोठ्या प्रमाणात सोसावे लागत आहे. म्हणून पुनविकास योजना राबवताना एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी तसेच नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्यात यावा अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात येतील. तसेच ट्रान्सफर फी तात्काळ रद्द करण्याची खात्री संजय शिरसाट यांनी विजय नाहटा यांना दिली. यावेळी शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, अजित सावंत, संजय कपूर, दीपक सिंग, संजय भोसले, मिलिंद सूर्यराव, श्रीकांत हिंदळकर, उपशहर प्रमुख आतिश घरत, सहसंपर्कप्रमुख भावेश पाटील, कल्पेश पाटील, विभागप्रमुख नागेश चव्हाण, कामगार सेनेचे प्रदिप वाघमारे, मिथुन पाटील, सुरेश काकडे, मंगेश गावडे, विकास गाढवे इत्यादी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.