सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मोठा गाजावाजा करत नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबईतील गोरगरीबांच्या मुलांसाठी महापालिका शाळांमध्ये सीबीएसईचे शिक्षण सुरु केले खरे. पण दिव्याखाली अंधार या स्वरुपात महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा कारभार सुरु असून सीबीएसईच्या शाळेतील मुलांना दसऱ्याची सुट्टी आता जवळ आलेली असताना ना गणवेश, ना पुस्तके अशा कारभार सुरु आहे. नर्सरीच्या प्रवेशासाठी सारसोळेच्या शाळेत स्थानिक परिसरातील पालक हेलपाटे मारत असतानाही महापालिका प्रशासन नर्सरीसाठी प्रवेश देत नसून नर्सरीचे वर्गही सुरु करत नसल्याची माहिती उबाठा युवा सेनेचे विभागप्रमुख सस्मित भोईर यांनी दिली.
सारसोळेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात महापालिका प्रशासनाने सीबीएसई शाळा सुरु केली खरी, पण तेथे महापालिका शिक्षण मंडळाचा अनागोंदी कारभार सुरु आहे. ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली व दुसरीच्या मुलांना सप्टेंबर महिना संपायला आला तरी पालिकेकडून गणवेश मिळालेला नाही. मुलांना पुस्तके मिळालेली नाहीत. मुले एकवेळ घरातील कपडे घालून येतील, पण पुस्तकेच नाही तर गरीबांच्या मुलांना या सीबीएसईच्या शाळेत काय शिक्षण मिळणार, असा संताप सस्मित भोईर यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक परिसरातून अनेक पालक सीबीएसईच्या शाळेतील नर्सरीत मुलांना प्रवेश मिळावा म्हणून हेलपाटे मारत असताना पालिका शाळेत या मुलांना प्रवेश मिळत नाही. नर्सरीचे वर्ग अजून सुरु झालेले नाहीत. नर्सरीचे वर्ग सुरु नसले तरी शिक्षण मंडळाने या शाळेत नर्सरीची पुस्तके पाठविली आहेत. ज्युनिअर व सिनीअर केजी, तसेच पहिली व दुसरीच्या मुलांना पुस्तकाअभावी काय शिक्षण मिळत असेल? याचा संताप सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
उबाठा सेनेचे सारसोळे गावातील पदाधिकारी सीबीएसई शाळेतील मुलांच्या गणवेशासाठी व पुस्तकांसाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महापालिका प्रशासनाच्या शिक्षण विभागाने १२ ऑगस्ट २०२४ रोजी सस्मित भोईर यांना लेखी पत्र पाठवून निविदाप्रक्रिया सुरु असून लवकरच कार्यवाही होईल व पुस्तकांचेही लवकर वितरण होईल, असे कळविले होते. तथापि या पत्रालाही आता सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. ज्युनिअर केजी, सिनिअर केजी. पहिली व दुसरीच्या मुलांना गणवेश तसेच पुस्तकेही मिळालेली नाहीत. या मुलांना शिकविण्यासाठी शिक्षकही पुरेसे नाहीत. ना पुस्तके, ना गणवेश, ना शिक्षक, कशाला चालवता सीबीएसईची शाळा असा संतापाचा सूर आता पालकांकडून आळविला जात आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांची भेट घेवून पुस्तके, गणवेश विलंबाबाबत व शिक्षकांच्या कमी संख्येबाबत विचारणा करणार असल्याची माहिती उबाठा युवा सेनेचे विभागप्रमुख सस्मित भोईर यांनी दिली.