स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांसंदर्भात सत्ताधारी नेते खोटी आश्वासने देत असताना हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या नवी मुंबईतील दोन्ही आमदारांनी राजीनामे द्यावे. मनसेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी अशी मागणी केली. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी वाढवलेली घरे नियमित व्हावी व नेरूळ, बेलापूर, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली मधील एलआयजी (आर्थिक दृष्ट्या दुर्बल) बांधवांनी कुटुंब विस्तारापोटी वाढवलेली घरे सुद्धा नियमित करावी अशी मनसेची भूमिका आहे. ही घरे नियमित करण्यासाठी मनसे सन्मा. राजसाहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून या दोन्ही विषयावर ठोस तोडगा काढणार आहे.
२५ सप्टेंबर पासून ते २ ऑक्टोबर पर्यंत मनसेचे गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते बेलापूर विधानसभेत परिवर्तन यात्रा काढणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या यात्रेत नवी मुंबईतील विविध घटकांना मनसे भेटणार आहे. सर्व सीबीएसई, आयसीएसई, खाजगी शाळांचे शासकीय ऑडिट करून सर्व शाळांची फी पुढील काही वर्षे वाढू देणार नाही अशी ठाम भूमिका गजानन काळे यांनी मांडली. भरमसाट वाढणारी फी पालकांसाठी मोठी डोकेदुखी आहे. मनसेने दिलेला उपाय हा पालकांना मोठा दिलासा देईल. रोजगारासंदर्भात राज्य सरकारच्या उद्योग विभागाने ९२९ नवी मुंबईतील कंपन्यांना पत्र पाठवून ८० टक्के रोजगार स्थानिकांना देण्या संदर्भात निर्देश दिले आहेत. कौशल्य, रोजगार विभागाने ८८८ नवी कंपन्यांची नोंदणी झाल्यानंतर उद्योग विभागाने ९२९ कंपन्यांना पाठवलेले पत्र हे तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. परिवर्तन यात्रेत मनसे तरुणांना भेटून त्यांच्याकडून बायोडाटा गोळा करणार आहे. पालिकेच्या एका शासकीय रुग्णालयात दोन वर्षाच्या बाळाला डॉक्टरांकडून कालावधी संपलेले औषध देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौफ्यस्फोट गजानन काळे यांनी केला. पालिकेचे डॉकटर औषधे घेण्यासाठी गरीब रुग्णांना खाजगी मेडिकल मध्ये पाठवते. मग पालिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कशाच्या आधारे बांधणार असा सवाल ही उपस्थित केला. तसेच मनसे भविष्यात सर्व खाजगी रुग्णालयांना प्रत्येक उपचारासाठी एक दरपत्रक लागू करण्यास राज्य सरकारला भाग पडणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले. यामुळे मोठ्या खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबेल. परिवर्तन यात्रेत मनसे महिला, विद्यार्थी, बुद्धिजीवी, कामगार, व्यापारी, पर्यावरण प्रेमी अशा विविध घटकांना भेटणार आहे.
ज्या नवी मुंबईकरांना परिवर्तन यात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९७६९७७७८८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गजानन काळे यांनी केले आहे. मनसेच्या या पत्रकार परिषदेत महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे उप शहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कौठुळे, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहर संघटक सनप्रीत तूर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, मनसे विभाग अध्यक्ष भूषण कोळी, अमोल आयवळे हे उपस्थित होते.