परिवर्तन यात्रेदरम्यान गजानन काळे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरले
नवी मुंबई : मनसेची परिवर्तन यात्रा सोमवारी नेरूळ पूर्वमध्ये पोहोचली. यावेळी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयास अचानक भेट दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात दुरवस्था आढळून आली. सर्व औषधे पालिकेने मोफत देणे असा नियम असताना अनेक रुग्णांना औषधे बाहेरून आणायला डॉक्टरांनी सांगितले आहे. यावेळी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उद्धव खिल्लारे यांना बोलवून गजानन काळे यांनी धारेवर धरले. ज्या ब्रँड ची औषधे रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये नाहीत, त्या ब्रँडची औषधे डॉकटर रुग्णांना लिहून देत असल्याचे आढळले. जी औषधे रुग्णालयात उपलब्ध आहेत, ती औषधे डॉकटर का लिहून देत नाहीत हा प्रश्न मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारला.
रुग्णालयात असणारी एकमेव सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे दिसून आले. यामुळे काही रुग्ण खोळंबून होते. त्यांना उपाय म्हणून दुसऱ्या पालिकेच्या रुग्णालयात का पाठवले नाही असा प्रश्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे एक डॉक्टर जेवणाची वेळ संपून एक तास झाले तरी रुग्णालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांचे हाल झालेले निदर्शनास आले. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर १५० ते २०० गरोदर महिला उपचारासाठी वाट बघत होत्या. परंतु फक्त २ स्त्री रोग तज्ञ या महिलांना तपासात असताना बघून नवी मुंबईतील आरोग्य व्यवस्था किती वाईट आहे याचे उदाहरण दिसून आले. जर महानगरपालिका रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टर, नर्स ची भरती करू शकत नसेल तर आमदार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ची खोटं स्वप्न का दाखवत आहेत असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला. या सर्व प्रश्नांसंदर्भात गजानन काळे यांनी नवी मुंबई वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांना फोन करून या बाबतीत जाब विचारला.
महापालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयाच्या या भेटीत गजानन काळे यांच्या सोबत मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, निखिल गावडे, अक्षय भोसले, विशाल चव्हाण, विभाग सचिव निलेश सैंदाणे, उप विभाग अध्यक्ष अमोल दहिफळे, शाखा अध्यक्ष प्रणित डोंगरे, गणेश पाटील, जालिंदर पवार, चेतन कराळे व मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक, नागरिक उपस्थित होते.