कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावली महाराष्ट्र कर्मचारी युनियन
संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऑनड्यूटी परिवहन सेवेत असताना झालेल्या अपघातात जखमी झालेल्या चालकाच्या उपचाराचा खर्च महापालिका प्रशासनाने न केल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र कर्मचारी युनियन करणार असल्याची माहिती कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिली.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील आसुडगाव डेपोतील चालक राजकुमार सोनकांबळे (बक्कल नंबर १५८६) हे बुधवारी, दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी बस क्र/एमएच ४३ बीजी ९८६२, कामगिरी क्र. ५९ नियोजित कामगिरी करत असताना ठिकाण (आदई तलाव, पनवेल ) येथे ड्रायव्हर साईटचा बसचा दरवाजा अचानक उघडला गेला. सदर चालकाने तातडीने पुढील अपघात टाळण्यासाठी वेळेत सावधगिरी बाळगून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नामध्ये चालकाचा बाहेरच्या बाजूला तोल गेल्याने सदर चालक सोनकांबळे हे चालत्या बसमधून खाली पडले गेले. चालकाच्या डाव्या पायाला जबर मार लागला असून तपासणीअंती डॉक्टरांकडून तीन जागी फ्रॅक्चर सांगण्यात आले आहे. (मांडीमध्ये व गुडघ्याच्या खाली व टाचेच्या घोट्यामध्ये ) व कमरेत तसेच हाताला मार लागला आहे. तसेच चालकाच्या पायात रॉड टाकण्यास डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. चालक सोनकांबळे हे वाशी, सेक्टर १० मधील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कामगार नेते रविंद्र सावंत हे मोरोक्को येथे आयटीएफच्या जागतिक परिषदेसाठी गेले होते. नवी मुंबईतील कर्मचाऱ्यांच्या समस्या, असुविधा याला जागतिक व्यासपिठावरुन वाचा फोडल्यावर आठ दिवसांनी भारतात आले असता त्यांनी मुंबई विमानतळावरुन घरी न जाता थेट वाशीतील प्रथम रुग्णालयात धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याची भेट घेतली. तत्पूर्वी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन महाव्यवस्थापकांची भेट घेतली व महापालिका आयुक्त कार्यालयात गेले असता आयुक्तांची भेट झाली नाही. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका कार्यालय व परिवहन व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले. कर्मचाऱ्यांना मेडीक्लेम नाही, आरोग्य सुविधा नाही, उपचाराचा खर्च दिला जात नाही, उपचारासाठी गैरहजर राहिल्यास वेतनातून कपात केली जाते. वारंवार पाठपुरावा करुनही पालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत, उपचाराबाबत उदासिनता दाखवित असल्याचा संताप व्यक्त करत महापालिकेने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी केला.
रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेत जखमी कर्मचाऱ्याच्या प्रकृतीबाबत व उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. त्या ठिकाणहूनच परिवहन व्यवस्थापक यांना मोबाईल वर कॉल करून कामगार नेते रविंद्र सावंत यांनी डॉक्टरांशी बोलणी करून दिली. खर्चाची जबाबदारी परिवहन व्यवस्थापकांनी घेतली आहे. तथापि परिवहननने खर्च न केल्यास महाराष्ट्र कर्मचारी युनियन जखमी चालकाच्या उपचाराचा सर्व खर्च करेल, अशी माहिती कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी दिली. यावेळी रविंद्र सावंत यांच्यासमवेत अशोक बिराजदार, नितीन गायकवाड, कांतीलाल चांदणे, गोविंद गायकवाड, हरी गायकवाड, चिंतामणी पाटील, ईजू राठोड, जितेश तांडेल, रमेश गायकवाड, राजू शेल्हाळकर, अकबर मुलानी, बाळू भालेराव, दादू भालेराव, संतोष पवार, अमित जाधव, रवी सोमवंशी, नरेश माघाडे, प्रकाश भोईर, शंकर सावंत, विकास कासार, संभाजी घोडके, गुरुनाथ सूर्यवंशी उपस्थित होते.