संपादक : सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केल्यावर जो शब्द देण्यात आला होता तो पाळला गेला नाही. जनतेला नको असलेला उमेदवार थोपवला. पक्षादेश मानून आम्ही या उमेदवाराचे काम करून त्याला बहुमताने निवडून आणले. परंतु बेलापूरच्या आमदाराने मागील दहा वर्षे कार्यकर्त्यांचा अपमान केला. त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली. बेलापूर शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ केला. पक्षाने २०१९ मध्ये शब्द पाळला नाही. २०२४ मध्ये देखील शब्द पाळला नाही. वारंवार आपली कोंडी करण्याचे काम केले. एक वेळ आमचा अपमान सहन करू, परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान याचा अपमान होऊ देणार नाही, असे माजी आमदार संदीप नाईक यांनी स्पष्ट केले.
वाशी येथे झालेल्या निर्धार मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी मंगळवारी संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा लढवावी, असा प्रचंड आग्रह धरला. बेलापूर मतदार संघातील सर्व प्रभागातील कार्यकर्ते, सर्वधर्मीय सर्व प्रांतिक, भाषिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते.
विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यामध्ये तुडुंब भरलेल्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर बेलापूर मतदार संघातील प्रत्येक विभागातून आलेले नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा लढवावी, अशी एकमुखी मागणी यावेळी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना केल. तसेच संदीप नाईक यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला.
संदीप नाईक यांनी २८ पेक्षा अधिक नगरसेवक, अधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संदीप नाईक आणि सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले. सर्वांचा सन्मान राखला जाईल, आपुलकीची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
आपले मनोगत व्यक्त करताना संदीप नाईक यांनी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि बेलापूर मतदारसंघातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल संदीप नाईक यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच हा विश्वास सार्थ ठरवू असा शब्द दिला.
आपली लढाई बेलापूरच्या सन्मानाची लढाई आहे. कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची आणि शहराच्या विकासाची लढाई असल्याचे संदीप नाईक यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांनी नवी मुंबई शहराचे नेहमीच हित जपले असून लोकनेते दि. बा. पाटील यांनी आग्रह धरलेल्या प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी साडेबारा टक्क्याची योजना असो, माथाडी बांधवांसाठी घरांची योजना असो किंवा महापालिका मुख्यालयासाठी नाममात्र दराने भूखंड उपलब्ध करणे असो, शरद पवारांमुळे हे शक्य झाल्याचे नमूद केले. नवी मुंबईसाठी मोरबे धरण विकत घेण्याचा धाडसी निर्णय नवी मुंबईच्या नेतृत्वाने घेतला. त्यावेळेस स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या माध्यमातून यासाठी शरद पवार यांनी सहकार्य केले. त्यामुळेच आज नवी मुंबई पाण्याच्या समस्येपासून दूर आहे. नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये आणि विकासात शरद पवारांनी वेळोवेळी पाठबळ दिले. महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या कार्याला त्याच्या सन्मानाला स्थान असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा आनंद असल्याचे संदीप नाईक म्हणाले. शरद पवारांच्या नेतृत्वामध्येच समृद्ध महाराष्ट्राची या पुढील वाटचाल होणार असल्याचेही ते म्हणाले. कोरोना संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता आमच्या सहकाऱ्यांनी कर्तव्य भावनेतून जनतेला मदत केली. नवी मुंबईची लूट होताना इतरजण मूग गिळून गप्प होते. मात्र त्या विरोधात आवाज उठवणारे आम्ही एकमेव होतो. नवी मुंबईच्या हितासाठी आणि शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पक्षांतराचा निर्णय घेत आहोत. आमच्यावर झालेले संस्कार आणि लाभलेला विचारांचा वारसा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांचा सन्मान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्हाला कोणत्या पदाची अभिलाषा नाही. परंतु ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा सन्मान नाही. शहर विकासाचे नुकसान होत असेल, हे आम्ही सहन करणार नाही. कार्यकर्त्यांच्या सन्मानाची आणि शहराच्या विकासाची ही लढाई असून आपण ती लढू आणि जिंकू, असा विश्वास संदीप नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संदीप नाईक हे विकासाचे व्हिजन असणारे युवा नेतृत्व असून निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची त्यांची कृती निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पूर्वी नवी मुंबईत यायचो, तेव्हा आपले काहीतरी हरवलेय, अशी भावना निर्माण व्हायची. आज मात्र हरवल्याचा गवसले आहे, अशी भावना आहे. विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली, असे सांगून संपूर्ण राज्यात तुतारीचा प्रभाव वाढत असून आमचे सरकार आल्यावर नवी मुंबईचे सर्व प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या एक-दोन दिवसात उमेदवाऱ्या जाहीर होतील. संदीप नाईक यांच्या हातात आम्ही तुतारी दिली आहे. बेलापूरच्या कार्यकर्त्यांचे सामर्थ्य मला माहित आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.