नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागलेल्या बेलापूर मतदारसंघाला राजकीय कुरुक्षेत्राचे स्वरुप प्राप्त झाले आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असणाऱ्या व तशी इच्छा जाहिररित्या व्यक्त करणारे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना भाजपाची उमेदवारी मिळाली नाही. भाजपाकडून बेलापूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार मंदाताई म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली आहे. संदीप नाईकांच्या मागे भाजपाच्या अधिकाधिक माजी नगरसेवकांचे व पक्षीय पदाधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. त्यामुळे माजी नगरसेवक व पक्षीय पदाधिकारी संदीप नाईकांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठी दबाव टाकत आहे. त्यामुळे बेलापूरच्या कुरुक्षेत्रावर सैनिक तयार, सेनापतीही तयार असून केवळ रणशिंग फुंकण्याची प्रतिक्षा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
भाजपाकडून विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाली असून मनसेकडून गजानन काळे यांचे तिकिट निश्चित आहे. संदीप नाईक व शिंदे गटाच्या शिवसेनेचे विजय नाहटा यांनीही विधानसभा लढण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून जोरदार तयारी केली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे गट सोडून तुतारीत जाण्याची भाषा बोलणाऱ्या विजय नाहटांच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून थंडावल्या आहेत. खासदार नरेश म्हस्केंना माझ्या प्रचारासाठी येऊ नका अन्यथा मी तुमच्याबाबत चांगले बोळानर नाही अशी भाषणातून घोषणा करणारे विजय नाहटा सध्याच्या राजकिय घडामोडीपासून अलिप्त असल्याने ‘गेले विजय नाहटा कुणीकडे’ अशी चर्चा बेलापुरच्या राजकारणात सुरु झाली आहे. विजय नाहटांची तुतारीशी होऊ पाहणारी जवळीकमध्ये ठाणेकरांनी खो घातला असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. संदीप नाईक आता काय भूमिका घेणार? तुतारी वाजविणार की मशाल पेटविणार या चावडी गप्पा रंगल्याने संदीप नाईकांच्या भूमिकेनंतरच बेलापूरच्या कुरुक्षेत्रारील घडामोडींना गती येणार आहे.