सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील बेलापुर विधानसभा मतदारसंघ सध्या राज्यातील राजकारणात बहूचर्चित विषय बनला असून भाजपाचे विद्यमान नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आता कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्रातील राजकारणाचे लक्ष लागले आहे.
भाजपाकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहिर झाली असून बेलापूरमधून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे तर ऐरोलीमधून लोकनेते व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना तिकिट जाहीर झाले आहे. बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांचाही इच्छूकांमध्ये समावेश होता. त्यादृष्टीने त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी करताना निवडणूक लढविण्याची आपली इच्छाही जाहिररित्या व्यक्त केली होती. भाजपाची संघटनाबांधणी करताना बेलापुर मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून संदीप नाईकांनी ‘सृजनांशी संवाद’ साधताना बेलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता.
संदीप नाईक यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून विधानभवनात चमकदार कामगिरी केलेली आहे. दांडगा जनसंपर्क, मतदारांशी थेट सुसंवाद, उच्चशिक्षित प्रतिमा, नवी मुंबई शहरात सातत्याने सर्वांधिक पायपीट करुन मतदारांच्या भेटी घेणारे एकमेव नेतृत्व, प्रगल्भ विचारसरणी, स्वच्छ प्रतिमा, युवा वर्गातील लोकाभिमुखता यामुळे इतर इच्छूकांच्या तुलनेत संदीप नाईकांची कामगिरी उजवी ठरत आहे.
‘आमदार आपल्या दारी’ या माध्यमातून त्यांनी ऐरोली मतदारसंघात पायपीट करताना मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. नगरसेवक बनल्यावर तीन वर्षे स्थायी समितीचे सभापतीपद भूषविताना ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबविताना प्रभागाप्रभागात जाऊन होत असलेल्या विकासकामांचीही खातरजमा करुन घेतली होती. पावसाळीपूर्व कामे होतात की कागदावरच दिसतात हे जाणून घेताना त्यांनी नवी मुंबईतील पदपथ, गटारे, नाले, खाण परिसर, डोंगराळ विभाग, चाळी, झोपडपट्टी, सिडको सोसायट्या सर्वत्र जाऊन स्वत: पाहणी केली होती. नवी मुंबई परिसरात सर्वांधिक वृक्षारोपण करणारा नेता अशी नवी मुंबईकरांमध्ये संदीप नाईकांची प्रतिमा आहे. विधानभवनात शंभर टक्के हजेरी लावणारे आमदार म्हणून सुशिक्षित मतदारांमध्ये संदीप नाईकांची एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून उमेदवाराची यादी जाहीर करताना बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यापासून बेलापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहे. भाजपाच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विसर्जित सभागृहातील सर्वच नगरसेवकांचा संदीप नाईकांना पाठिंबा आहे. पक्षातील पदाधिकारी संदीप नाईकांच्या भेटीगाठी घेत असून निवडणूक लढविण्यासाठी त्यांना साकडे घालत आहेत. पक्षातील माजी नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीतही संदीप नाईकांच्या उमेदवारीला समर्थंन देत लवकरात लवकर भूमिका घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे संदीप नाईक काय भूमिका घेतात, हे येत्या काही तासांतच स्पष्ट होणार असून सर्वांधिक माजी नगरसेवकांचा व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा असलेला पाठिंबा पाहता संदीप नाईकांचे आजच्या घडीला बेलापूर विधानसभा मतदारसंघात पारडे जड आहे. त्यातच सुशिक्षित मतदार संदीप नाईकांची भेट घेऊन निवडणूक लढविण्यासाठी त्यांना गळ घालत आहे. सोशल मीडियातूनही संदीप नाईकांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे संदीप नाईक येत्या काही तासांमध्ये कोणता राजकीय निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. त्यातच रविवारी भाजपाच्या काही नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवारी निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपण भाजपा सोडल्याचे सोशल मीडियावरुन जाहीर केल्याने बेलापुर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील बहूचर्चित मतदारसंघ बनला आहे.