संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार स्वीप (मतदार जागरूकता व मतदान सहभाग ) कार्यक्रमाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय नियुक्त नवी मुंबई नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांकरिता ८ अतिरिक्त स्वीप नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यानुसार आज स्वीप उपक्रमांतर्गत सकाळी वाशी येथील मिनी सी शोअर परिसरात जॉगिंगसाठी मोठ्या प्रमाणावर असणारी उपस्थिती लक्षात घेऊन सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या माध्यमातून विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांना २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वांसह मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली.
आज रविवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घरी भेटतील हे लक्षात घेत विविध सोसायट्यांना भेटी देऊन तेथील रहिवाश्यांचे मतदान करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले. यामध्ये विशेषत्वाने नेरूळ विभाग कार्यालयामार्फत सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री जयंत जावडेकर आणि त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने सेक्टर १९ नेरूळ येथील अलकनंदा सोसायटीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच मतदान करण्याविषयीची संकल्पपत्रे नागरिकांकडून भरून घेण्यात आली.
त्याचप्रमाणे शिवाजीनगर झोपडपट्टी भागात प्रौढ मतदार नागरिकांशी संवाद साधताना ज्येष्ठ नागरिकांशी विशेष संवाद साधण्यात आला. यामध्ये ८० वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना त्यांच्या घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली. त्यासाठी ‘१२ डी’ चा अर्ज भरून देण्याविषयीही माहिती देण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित युवा वर्गाशी संवाद साधत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा व कुटुंबिय आणि परिसरातील इतरांनाही मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात आले.
बेलापूर व ऐरोली विधानसभा निवडणूक कार्यालयांमार्फत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही व्यापक प्रमाणात जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.