नवी मुंबई : गणेशोत्सव व नवरात्रौत्सवादरम्यान महायुती सरकारने घरगुती दरानेच आयोजक मंडळांना वीज उपलब्ध करुन दिली होती, त्याच धर्तीवर वारकरी मंडळांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्येही घरगुती दरानेच वीज आकारण्यात यावी अशी मागणी नेरूळ सेक्टर सहामध्ये अनेक वर्षे त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या माध्यमातून व ह.भ.प किसन महाराज आमले यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणाऱ्या दिलीपदादा आमले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
व्यसनमुक्तीच्या उद्देशाने नेरूळ सेक्टर सहा परिसरात नुतन वर्षारंभीच दिलीपदादा आमले हे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत असून या माध्यमातून व्यसनमुक्तीवर भर देण्यात येत असतो. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भाविक मोठ्या संख्येने येत असून भजन, किर्तन, हरिपाठ याद्वारे वातावरणातही आध्यात्मिकता पसरण्यास मदत होते. नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, कोपरखैराणे, ऐरोली परिसरात मोठ्या प्रमाणावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. त्यामुळेच नवरात्रौत्सव, गणेशोत्सवाच्या धर्तीवर या अखंड हरिनाम सप्ताहांनाही घरगुती दरानेच वीज पुरविण्याची मागणी दिलीपदादा आमले यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.