नवी मुंबई : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा फोटो शुक्रवार , दि. १ नोव्हेंबरपासून व्हायरल होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी शनिवारी, दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. रिक्त झालेल्या पदासाठी कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्षा पूनम पाटील ही नावे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चिली जात आहे. तसेच जवळपास तीन दशके कॉंग्रेसमध्ये असलेले व सध्या दुसऱ्या पक्षात कार्यरत असलेले मातब्बर नेतृत्व कॉंग्रेस पक्षात प्रवेश करुन जिल्हाध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यताही कॉंग्रेस वर्तुळात चर्चिली जात आहे.
अनिल कौशिक यांनी कॉंग्रेस सोडण्याची ही पहिली वेळ नाही. मागेही त्यांनी हरियाणामध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. महापालिकेच्या दुसऱ्या सभागृहात अनिल कौशिक नगरसेवक होते. महापौरपदाच्या निवडणूकीत मे २००० साली कॉंग्रेसचे नामदेव भगत पराभूत झाले असले तरी उपमहापौरपदी अनिल कौशिक निवडून आले होते. त्यानंतर १६ नोव्हेंबर २००२ रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणूकीत नामदेव भगत समर्थकांनी मागील महापौर निवडणूकीचा राजकीय हिशोब चुकता केल्याने महापौर पदाच्या निवडणूकीत अनिल कौशिक दणदणीत पराभूत झाले, परंतु उपमहापौरपदी कॉंग्रेसचे नगरसेवक रमाकांत म्हात्रे निवडून आले होते. त्यानंतर कौशिक पालिका निवडणूकीत सातत्याने पराभूतच झाले आहेत. व्हायरल फोटोमध्ये अनिल कौशिक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मंदाताई म्हात्रे यांचे पुत्र व भाजपाद पदाधिकारी निलेश म्हात्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत स्पष्टपणे दिसत असल्याने त्यांचा भाजपा प्रवेश झाल्याची नवी मुंबईत चर्चा सुरु झाली आहे.
अनिल कौशिक यांची मागील काही महिन्यांपासून भाजपाशी जवळीक वाढल्याची नवी मुंबईत चर्चा सुरु होतीच. कौशिक सातत्याने पालिका निवडणूकीत पराभूत होत असल्याने त्यांनी मुलाला महापालिकेत नगरसेवक म्हणून पाठविण्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेत भाजपाशी जवळीक वाढविल्याचेही नवी मुंबईच्या राजकारणात बोलले जात आहे. व्हायरल फोटोवरुन मागील काही महिन्यात सुरु असलेल्या राजकीय चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या रिक्त पदासाठी कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्षा पूनम पाटील हे तीन प्रबळ दावेदार मानले जात आहेत. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष पद फार काळ रिक्त ठेवता येणार नसल्याने दोन-तीन दिवसात नवीन जिल्हाध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. कामगार क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात चर्चेतील चेहरा असणारे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रविंद्र सावंत यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा कॉंग्रेस वर्तुळात जोर धरत असली तरी रमाकांत म्हात्रे हेही प्रबळ दावेदार आहेत. अनिकेत म्हात्रे यांना विधानसभा तिकिट न मिळाल्याने रमाकांत म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष पद सोपवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे.