श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापूर विधानसभेत निवडणूकीदरम्यान आता प्रचारादरम्यात रंगत येऊ लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व अपक्ष उमेदवार विजय नाहटा, विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तुतारी हातात घेऊन उभे असलेले संदीप नाईक यांच्यात खऱ्या अर्थाने लढाई होत आहे. बंडखोर अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी प्रचारात मुसंडी मारल्याने आणि मतदार त्यांच्या बाजूने उभा राहिल्याचे प्रथम दर्शनी चित्र दिसत आहे. मागील दहा वर्षापासून विजय नाहटा हे सातत्याने जनतेच्या संपर्कात आहेत.
विजय नाहटा यांच्या प्रचाराचा आणि कार्यक्रमाचा निवडणूक रिंगणात असलेल्या अन्य उमेदवारांनी धसका घेऊन विरोधकांनी विजय नाहटा माघार घेणार आहेत, त्यांच्यावर मुख्यमंत्री दबाव आणत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून नाहटा उमेदवारी मागे घेणार आहेत, अशा अफवा मतदारसंघात पसरवल्या जात आहेत. या विषयी विजय नाहटा यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माझे विरोधक घाबरून गेले असल्यामुळे अशा वावड्या ते उठवत आहेत. पण मी आजही सांगतो मी निवडणूक लढवणार आहे. ज्या दिवशी मी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी जाहीर केले होते. त्यावेळेस काही पत्रकारांनी मला विचारले होते की, आपण अर्ज मागे घेणार आहात का म्हणून. तर मी त्याही दिवशी नाही हेच सांगितले होते आणि आजही तेच सांगत आहे. मी मैदान सोडणार नाही. मी ताकदीने निवडणूक लढणार आहे आणि मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करणार आहे. एकच सांगतो, विरोधक घाबरले असल्याने जनतेत मी माघार घेणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. उमेदवारी मागे घेणार, असे काहीही होणार नाही. माझ्यावर कोणाचाच दबाव नाही म्हणून मी निवडणूक लढणारच आहे, असे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी यावेळी सांगितले.