श्रीकांत पिंगळे : Navimumbaillive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक मतदारसंघात लढती चुरशीच्या होत असून यातील अनेक लढती बहूचर्चित ठरल्या आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बेलापूर मतदारसंघातील निवडणूक रिंगणात पाचही उमेदवार मातब्बर असले तरी प्रत्यक्षात विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक आणि अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात सहभागी झालेले शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्यातच खरी लढत होत आहे. मनसेचे गजानन काळे व अन्य एक मातब्बर अपक्ष उमेदवार शिवसेनेचे अशोक गावडे हेदेखील निवडणूक रिंगणात सहभागी झाले आहेत.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे या दोन वेळा बेलापूर मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. एकदा विधान परिषदेवरही आमदार म्हणून एकदा मंदा म्हात्रेंनी प्रतिनिधीत्व केलेले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक हेदेखील नवी मुंबईच्या राजकारणात मातब्बर प्रस्थ असून ते ऐरोली विधानसभेतून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. अपक्ष उमेदवार असलेले विजय नाहटा हे शिवसेनेचे उपनेते असून त्यांनी काही कालावधीकरता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. शिवसेनेचे अन्य एक मातब्बर अशोक गावडे हेदेखील विधानसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून सहभागी झालेले आहेत. अशोक गावडे यांनी नवी मुंबईचे उपमहापौरपद भूषविले असून पालिकेच्या चौथ्या व पाचव्या सभागृहात ते नगरसेवक होते. त्यांची पत्नी सौ. निर्मला गावडे व मुलगी अॅड. सपना गावडे यादेखील महापालिका सभागृहात नगरसेविका होत्या. अशोक गावडे हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक वर्षे संचालक होते.
संदीप नाईक यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केलेली संघटना बांधणी विधानसभा निवडणूकीत प्रचार अभियानादरम्यान उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. बेलापूर मतदारसंघातील अनेक क्रिकेटचे संघ खेळाचे मैदान सोडून संदीप नाईकांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. या सर्व संघाशी संदीप नाईकांची गेल्या काही वर्षांपासून जवळीक आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उबाठा गटाची शिवसेना व कॉंग्रेस एकदिलाने संदीप नाईकांच्या प्रचारात सहभागी झाली आहे. भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र घरत या अनुभवी नेतृत्वाची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली असली तरी भाजपा संघटना आजही खिळखिळी आहे. तुलनेने संदीप नाईकांकडे नगरसेवकांचा व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा ताफा आहे. जुन्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची फौज आहे. संदीप नाईकांचा युवकांचा ताफा आहे. स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबविणारी निष्ठावंतांची फळी आहे. संदीप नाईकांचा मित्र परिवार वेगळ्या पद्धतीने प्रचारात आक्रमक झाला आहे.
मनसेच्या गजानन काळे यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सोशल मीडियावर भर दिला असला तरी सोशल मीडियाचा प्रचार मतपेटीत मताधिक्य मिळवून देण्यात तकलादू ठरत असतो. विद्यार्थी घटकासाठी केलेल्या कार्यावर गजानन काळेंचा जनाधार स्पष्ट करणार आहे. विजय नाहटा यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक व पक्षीय पदाधिकारी आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी परिसरात विजय नाहटांनी मुसंडी मारली असून अन्य उमेदवारांच्या प्रचाराला तेथे सुरुवातही झालेली नाही. बेलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार मंदाताई म्हात्रे व संदीप नाईक यांच्यातच खरी लढत असून अन्य उमेदवारांना मिळणारी मते ही मंदाताई म्हात्रे व संदीप नाईकांच्या विजयाला मदत करतात अथवा अडथळे निर्माण करतात, याचे उत्तर २३ नोव्हेंबरला मिळेल.