स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संदीप नाईक यांनी निवडणूक लढविली. या निवडणूकीत अटीतटीच्या लढतीमध्ये संदीप नाईक यांचा ३७७ मतांनी पराभव झाला. पराभवाचे शल्य बाजूला ठेवत संदीप नाईकांनी नव्या जोमाने जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रिय होत मतदानातून विश्वास दाखविणाऱ्या जनतेची कामे करण्यासाठी आपण सज्ज असल्याचा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे.
शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी पराभव झाल्यावर रविवारी सकाळीच संदीप नाईकांनी भेटीगाठीचा सपाटा सुरु ठेवल्याने पराभवाने खचून न जाता संदीप नाईक नव्या जोमाने कार्यरत झाले असल्याचे नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळाले. रविवारी वाशीत दिवसभर महाविकास आघाडीच्या वतीने प्रचार अभियानामध्ये मेहनत घेणाऱ्या शिवसेना उबाठाचे गटाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी, कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी तसेच हितचिंतक, समर्थंक यांच्या भेटीगाठी घेत त्यांचे आभार मानले. तिकिट वाटपात भाजपाने डावलल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत संदीप नाईकांनी निवडणूक लढविली. जेमतेम महिनाभराच्या कालावधीत ९१४७५ मते संदीप नाईकांनी मिळविली.
रविवारी वाशीमध्ये सानपाडा, वाशी, बेलापुर येथील महिला सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप नाईक यांची भेट घेत त्यांच्या अडचणी कथन केल्या. त्यावेळी महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रविवारी दिवसभरात संदीप नाईकांनी भेटीगाठीवर भर दिल्याने पराभवाने खचून न जाता बेलापूर विधानसभा मतदारसंघात जनसामान्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या समस्या निवारणासाठी उपलब्ध राहणार असल्याचे संकेत यावेळी दिले.