माजी नगरसेविका सुजाता पाटील यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये असलेल्या महापालिकेच्या राजमाता जिजाऊ उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती व प्रभाग ८५च्या माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीअंर्तगत भागात महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यातील खेळणी तुटल्याने मुलांना खेळताना खाली पडून जखमा झाल्या आहेत. एका खेळण्याच्या एका बाजूचा भाग गळून पडला आहे. त्यामुळे लहान मुले खेळताना तोल जावून जमिनीवर पडतात. त्यामुळे हे तुटलेले खेळणे तातडीने दुरुस्त होणे आवश्यक असल्याचे सुजाता पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
उद्यानात असलेले ओपन जीममधील पायाचा व्यायाम करण्याचे साहित्य नादुरुस्त झाले आहे. एका पायाच्या हलविण्याच्या साहित्यात बिघाड झाला आहे. ओपन जीममध्ये परिसरातील रहीवाशी, विशेषत: महिला वर्ग मोठ्या संख्येने येत आहे. ओपन जीममधील हे साहित्य बिघडल्याने महिलांना पायाचा व्यायाम करता येत नाही. त्यामुळे ओपम जीममधील या नादुरुस्त साहित्याची लवकरात लवकर दुरुस्ती होणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य पाहता उद्यानातील तुटलेल्या खेळण्याची व ओपन जीममधील नादुरुस्त साहित्याची तातडीने दुरुस्त करण्याचे संबंधिताना आदेश देण्याची मागणी माजी नगरसेविका सुजाता पाटील यांनी केली आहे.