स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा / निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार व मागासवर्गीय घटकातील इ. १ली ते महाविदयालयीनपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे ही योजना ऑनलाईन पध्दतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. ३० नोव्हेंबर रोजी या योजनेची अंतिम मुदत होती. तथापि दिवाळी सण व त्यानंतर आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका यामुळे नवी मुंबईकरांना अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने योजनेला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शिष्यवृत्ती योजनेकरीता दि. ६ सप्टेंबर रोजी स्थानिक वृत्तपत्रामध्ये दि.०७/०९/२०२४ ते दि. २०/१०/२०२४ या कालावधीत विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.schemenmmc.com या संकेत स्थळावर स्विकारण्याकरीता जाहिर आवाहन प्रसिध्द करण्यात आले होते. त्याअनुषंगाने उक्त योजने अंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेकरीता दि.३० नोव्हेंबर प्रथम मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
तथापी माजी नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे मुदतवाढीसाठी लेखी निवेदन सादर करत पाठपुरावाही केला होता. ही मागणी लक्षात घेता उक्त योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेकरीता १५ डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली. सुजाता पाटील यांच्यामुळे शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ मिळाल्याने नवी मुंबईकरांकडुन सुजाता पाटील यांचे आभार मानण्यात येत आहेत.