पक्ष कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत घेतला निर्णय
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने जनतेची सेवा करण्यास मी सज्ज झालो आहे. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थेच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार असून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. जुन्नर शहरात स्वतंत्र कार्यालय स्थापन करून तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांचे प्रश्न या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत. पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करून बूथ रचना मजबूत करणार आहे. सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क साधणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांनी केले आहे. जुन्नर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यासह सहकारी संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचा निर्णय नारायणगाव (ता. जुन्नर) येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल बेनके यांचा पराभव झाला. याबाबत चर्चा करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक अतुल बेनके यांच्या उपस्थितीत नारायणगाव येथे स्व. वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, गणपतराव फुलवडे, जयेश खांडगेपाटील, संजय वऱ्हाडी, प्रकाश ताजणे, बाळासाहेब खिलारी, फिरोज पठाण, पापाशेठ खोत, तानाजी तांबे, विशाल तांबे, रामदास अभंग, मारुती वायाळ, काळू शेळकांदे, गणपत कवडे,अतुल भांबेरे, गोविंद बोरचटे, उज्ज्वला शेवाळे, सुप्रिया लेंडे, अक्षदा मांडे, पुष्पा गोसावी, वैष्णवी चतुर आदी उपस्थित होते.
मागील पाच वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागली. माझ्या काळात सुरू केलेले मात्र अपूर्ण असलेले चिल्हेवाडी पाईपलाईनसह अन्य प्रकल्प मोठ्या ताकदीने पूर्ण करणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेत आले आहे, याचा मनस्वी आनंद झाला असून, अजित पवार हे पालकमंत्री होणार आहेत. याचा फायदा जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी होणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली आहे.