स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १४ मधील कुकशेत गावामध्ये सुरु असलेल्या रिजेन्सीच्या बांधकामामुळे धुळीचे प्रदूषण पसरले असून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांना आजाराच्या खाईत सोडणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याची लेखी मागणी ‘आम्ही नवी मुंबईकर युवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विनायक पिंगळे यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
कुकशेत गावामध्ये महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्र आहे आणि त्यालगतच महापालिकेचे नेरूळ विभाग कार्यालय आहे. नेरूळ विभाग कार्यालय काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी आले असून त्यापूर्वी ते नेरूळ सेक्टर चार येथे पालिका शाळेत चालविण्यात येत होते. या विभाग अधिकारी कार्यालय व नागरी आरोग्य केंद्रासमोरच रिजेंन्सी या बांधकाम व्यावसायिकाचे टॉवरचे गेल्या काही वर्षांपासून बांधकाम सुरु आहे. पर्यावरणाचे व महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन या ठिकाणी बांधकाम सुरु आहे. या बांधकामामुळे परिसरात धुळीचा विळखा पडला असून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करुनही कारवाई होत नाही. नागरी आरोग्य केंद्र उपचारासाठी येणाऱ्या व महापालिका विभाग कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना बांधकामातून होणाऱ्या धुळीच्या उद्रेकाचा सामना करावा लागत आहे. विभाग अधिकारी कार्यालयासमोरच हा प्रकार सुरु असून बांधकामाकडे पालिका प्रशासन कानाडोळा करत आहे. या बांधकाम व्यावसायिकांवर धुळीचे प्रदूषण निर्माण होत असल्याबाबत तातडीने कारवाई करण्याची व कारवाई करायची नसेल तसेच स्थानिक जनतेला धुळीच्या विळख्यातच खितपत ठेवायचे असेल तर महापालिकेचे विभाग कार्यालय पुन्हा जुन्याच ठिकाणी नेरूळ सेक्टर चारमधील पालिका शाळेत स्थंलातरीत करण्याची मागणी विनायक पिंगळे यांनी केली आहे.