अपघातांना आळा घालण्यासाठी कॉंग्रेसचे महापालिका आयुक्तांना साकडे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन परिसरात महापालिकेच्या मल:निस्सारण केंद्रासमोरील रस्त्यावर गतीरोधक तातडीने बसविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर दोन परिसरात महापालिकेचे मल:निस्सारण केंद्र आहे. या मल:निस्सारण केंद्रासमोरच श्रमिकांची, अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची एलआयजी वसाहत आहे. शेजारील शिरवणे विद्यालय ही शाळा आहे. एलआयजी व मल:निस्सारण केंद्र यामध्ये एक छोटेखानी रस्ता आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची पार्किंग असते. उरलेल्या रस्त्यातून वाहने ये-जा करतात. त्यात शाळेची मुले, त्यांचे पालक, नेरूळ-जुईनगरदरम्यान ये-जा करणारे नागरिक, एलआयजीमधील रहीवाशी यांचीही याच रस्त्यावरुन वर्दळ सुरु असते. अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहने येथून वेगाने जात असतात. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. रहीवाशी तसेच शालेय बालकांना व त्यांच्या पालकांना दुखापतीही झाल्या आहेत. या ठिकाणी शाळेच्या कोपऱ्यावर तसेच मल:निस्सारण केंद्राच्या समोर गतीरोधक बसविल्यास वाहनांच्या वेगाला मर्यादा पडेल व अपघातांना आळा बसेल. या परिसरातील समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना या ठिकाणी गतीरोधक तातडीने बसविण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.