नवी मुंबई : नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमध्ये १८, १९, २० जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाविरोधात नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत या कार्यक्रमास परवानागी नाकारण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळच्या डी.वाय.पाटील स्टेडियमध्ये १८, १९, २० जानेवारी २०२५ रोजी कोल्ड प्लेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून बुक माय शो या बहूचर्चित कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीची जबाबदारी स्विकारलेली आहे. या कार्यक्रमाची तिकिट विक्री ऑनलाईन असल्याने काही वेळातच तिकिट विक्री झाली असून शो हाऊस फुल्लही झाला. या कार्यक्रमाची तिकिटची मोठ्या प्रमाणावर काळ्या बाजारात विक्री होत असून याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या बाजूलाच रुग्णालय आहे. रुग्णालयातील रुग्णांना या कार्यक्रमाचा त्रास होण्याची शक्यता आहे. यातून रुग्ण दगावण्याचीही भीती आहे. असा काही प्रकार घडल्यास कार्यक्रमाच्या आयोजकांवर व त्यांना कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.
मुळात हा कोणताही सामाजिक सेवेच्या आयोजनासाठी शो आयोजित करण्यात आला नसून पूर्णपणे व्यावसायिक शो आहे. मुळात ज्या ठिकाणी आयोजन कार्यक्रम केले जाते, त्या आयोजकांनी कार्यक्रमाची, तेथे येणाऱ्या प्रेक्षकांची, त्यांच्या वाहन पॉर्किगची जबाबदारी घेणे आवश्यक असते. दुर्दैवाने डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या बाबतीत तसे न होता डी. वाय. पाटील स्टेडियमला व त्या त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना कार्यक्रमातून बक्कळ निधी उपलब्ध होतो, पण त्याची फार मोठी किंमत त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक रहीवाशांना, नेरूळवासियांना पर्यायाने नवी मुंबईकरांना चुकवावी लागत आहे. या ठिकाणी असणारे क्रिकेटचे सामने असो वा बुक माय शोसारखे खासगी कार्यक्रम असो,. यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहन पॉर्किगबाबत ना डी.वाय. पाटील स्टेडियम, ना आयोजक, ना पोलिस, ना महापालिका विचार करते. त्याची किंमत स्थानिक नेरूळवासियांना मोजावी लागते व मनस्ताप सहन करावा लागतो.
डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनाच्या पार्किगची जबाबदारी डीवाय पाटील स्टेडिअम कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन देणाऱ्या डीवाय पाटील स्टेडिअमच्या व्यवस्थापणाने व कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्विकारणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने तसे होत नाही. कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजक व जागा उपलब्ध करुन देणारे स्टेडिअम व्यवस्थापण पैसा कमवून मोकळे होतात. पण कार्यक्रमासाठी येणारे प्रेक्षक स्टेडिअम सभोवतालच्या नेरूळ परिसरात मिळेल तिथे जागा मिळेल तिथे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुक कोंडी होते, वाहतुकीचा ताण पोलिसांना सहन करावा लागतो. येणाऱ्या जाणाऱ्या हु्ल्लडबाजांवर नियत्रंण ठेवण्याचे काम पोलिसांना करावे लागते. स्थानिक ये-जा करताना त्रास होतो, त्यांच्या वाहनांना उभे करण्यासाठी जागा मिळत नाही. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी व कार्यक्रम संपल्यावर किमान तासभर रस्त्यावर वाहतुक कोंडी असते. स्टेडियमच्या बाजूलाच डी. वाय. पाटील रुग्णालय आहे. या ठिकाणी कोठेही पॉर्किग व्यवस्था नाही. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने येणार असल्याने पॉर्किग व्यवस्था तसेच टॉयलेटची सुविधा आवश्यक आहे. एकतर आधीच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वाहनासाठी पॉर्किग उपलब्ध होत नाही. अशा कार्यक्रमाचा रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांनाही त्रास होतो. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता, स्थानिकांना होणारा त्रास, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा मनस्ताप, वाहतुक कोंडी, पोलिस यंत्रणेवर तसेच महापालिका यंत्रणेवर निर्माण होणारा संभाव्य ताण पाहता महापालिका प्रशासनास व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयास या कार्यक्रमास परवानगी नाकारुन संबंधितांना कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.