जय
नौदलाच्या स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यान प्रवाशांची ये-जा करणाऱ्या बोटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रवासी वाहतुकीच्या बोटीला तर जलसमाधी मिळालीच, परंतु या बोटीतील १० प्रवाशी आणि तीन नौदल कर्मचारी अशा १३ जणांना मृत्यू झाला आहे. मुळातच या अपघातात प्रवासी बोटीचा काहीही दोष नव्हता, दोष होता तो नौदलाच्या स्पीड बोटीचे संचलन करणाऱ्या चालकाचाच. अपघात झाल्यानंतर नौदलाच्या काही घटकांकडून अपघाताचे खंडन करण्याचा प्रयत्न झाला, प्रवासी बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने अपघात झाल्याचा दावाही नौदलाकडून करण्यात आला. तथापि क्षमतेपेक्षा २० प्रवासी बोटीमध्ये कमी असल्याने व स्पीड बोटीच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात महायुतीचे लोकहितैषी सरकार सत्तेवर असल्याने या अपघाताची राज्य सरकारकडून तातडीने दखलही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हालचाली करत याप्रकरणी संबंधितांना मदत करण्याचा प्रयत्न केला, प्रशासकीय यंत्रणा तातडीने हलविली. जखमींना उपचाराची व्यवस्था करुन दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली. अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळाली असती तर कदाचित मृतांपैकी अनेकांना वाचविणे शक्यही झाले असते. इरशाळवाडीच्या घटनेपासून दुर्घटना झाल्यावर एकनाथ शिंदे गंभीरपणे लक्ष देतात, याचा महाराष्ट्राचे जवळून अनुभव घेतलेला आहे. दूर दूरपर्यंत नजर जाईल इतका अथांग सागर पसरलेला असताना स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? हा अपघात कसा घडला? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. एका प्रत्यक्षदर्शीने या अपघाताचा शूट केलेला व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरुन हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. एलिफंटाला चाललेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला स्पीड बोट धडकली. ही स्पीड बोट नौदलाची होती. नौदलाकडून हा अपघात कशामुळे झाला? त्या बद्दल स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नौदलाने सांगितलं की, मुंबई बंदरात स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरु होती. त्यावेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने स्पीड बोटीच नियंत्रण सुटले व स्पीड बोट नीलकमल बोटीला येऊन धडकली. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात स्पीड बोट नील कमल बोटीपासून काही अंतरावर समुद्रात राऊंड मारताना दिसत आहे. स्पीड बोट टर्न झाल्यानंतर नीलकमल बोटीच्या दिशेने येताना पूर्णपणे अनियंत्रित झाली व नीलकमल बोटीला धडकली. या अपघातामुळे मुंबई, ठाणे, रायगड भागात हळहळ व्यक्त केली जात असतानाच नाशिक जिल्ह्यावरही या अपघाताचे पडसाद उमटले आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांवच्या आहेर दाम्पत्यांसह चिमुकल्याचा मुत्यु झाला. म्हणजे संपूर्ण कुटूंबच उद्धवस्त झाले. आजारावर उपचारासाठी पिंपळगांवच्या राकेश नाना आहेर हे दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबई येथे गेले होते. परंतु बोट दुर्घटनेत आहेर कुटुंबियांचा बळी गेला.
अपघाताची चौकशी करताना नौदलाकडूनच स्पष्ट करण्यात आले की, नीलकमल बोटीला धडक देणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोटीचे इंजिन नुकतेच बदलण्यात आले होते. त्यामुळे या बोटीची चाचणी सुरू होती. अशा चाचणीदरम्यान बोट आठ आकड्याच्या आकारात समुद्रातून फिरवली जाते. मात्र, दुर्दैवाने याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि चालकाचा बोटीवरील ताबा सुटून ही स्पीडबोट नीलकमल बोटीवर आदळली. या बोटीवर नौदलाचे २ जवान आणि या बोटीला इंजिन पुरवणाऱ्या कंपनीचे ४ कर्मचारी उपस्थित होते. प्रचंड वेगात ही स्पीडबोट आदळल्याने स्पीडबोटीवरील तिघांचा मृत्यू झाला. या स्पीडबोटच्या प्रचंड वेगामुळे नीलकमल बोटीला मोठी भेग पडली. जणू तिचे दोन तुकडे झाल्याप्रमाणे तिची स्थिती झाली. स्पीडबोटचाही चक्काचूर झाला. एव्हाना नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरू लागले. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. त्यांची तारांबळ उडून पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती कळताच शेजारील अन्य बोटी, नौदल आणि कोस्टगार्डच्या बोटींसह नौदल हेलिकॉप्टरने तत्काळ बचावकार्य सुरु केले परिणामी ९९ जणांना वाचवण्यात यश मिळाले. नीलकमल बोटीवरील ५ क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. नीलकमल बोटीत वेळेत लाईफ जॅकेट दिले नसल्याचा आरोप बोटीतून बचावलेल्या एका प्रवाशाने केला आहे. अपघात झाल्यानंतर पाणी बोटीत शिरल्यानंतर लाईफ जॅकेट दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान बोटीत पुरेशी लाईफ जॅकेट उपलब्ध नव्हती, अशी माहितीही काही प्रवाशांकडून प्राप्त झाली आहे. लाईफ जॅकेट प्रवासी बोटीवर असती तर कदाचित मृतांना वाचविणे शक्य झाले असते. नौका चालक आणि जबाबदार इतरांवर हा गुन्हा दाखल केला आहे. बचावलेले नथाराम चौधरी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता चौकशी करण्यात येईल. दोषींना शासन होईल. पण अपघातात ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. त्यांचे काय? पाच लाखांच्या मदतीने ही पोकळी भरुन निघणार आहे काय? नौदलाच्या बोटींना सराव करताना खबरदारी घेणे आवश्यक होते. तसेच प्रवासी सुविधा देणाऱ्या बोटीच्या मालकानेही माफक प्रमाणावर लाईफ जॅकेट ठेवणे आवश्यक होते. तसेच समुद्रात अपघात घडल्यावर तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. रस्त्यावरील अपघात आणि सागरातील अपघात यात कमालीचा फरक आहे. रस्त्यावरील अपघातात रुग्णवाहिका तसेच अन्य मार्गाने मदत देता येते. पण सागरातील अपघात थेट खोल पाण्यातच होत असल्याने काही मिनिटातच होत्याचे नव्हते होऊन बसते. नीलकमलच्या अपघातातही तेच घडले आहे. लाईफ जॅकेटचा तुटवडाप्रकरणी नीलकमलचा मालक, नौदलाच्या स्पीड बोटीवरील चालक तितकेच जबाबदार असून मदतीस झालेला विलंब याचीही यानिमित्ताने चौकशी होणे आवश्यक आहे. घटनेतून बोध घेत प्रशासनाने सागरात योग्य ती उपाययोजना तातडीने करावी. अन्यथा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा तसेच उरण या भागात ये-जा करणाऱ्या प्रवासी बोटीतून प्रवास करणे म्हणजे मृत्यूसोबत घेऊन सागरी प्रवास करण्यासारखे होईल.