लोकनेते नामदार गणेश नाईक यांचे नवी मुंबईत जंगी स्वागत
नवी मुंबई : नामदार गणेश नाईक यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर जनतेची सेवा हाच माझा सत्कार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदी नियुक्ती झाली म्हणून कोणत्याही प्रकारच्या जाहीर सत्कार समारंभाचे कार्यक्रम नामदार गणेश नाईक स्वीकारणार नाहीत, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे. जनतेचे प्रश्न, अडीअडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच जनता दरबार उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी केले.
राज्याच्या वन खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर लोकनेते नामदार गणेश नाईक यांचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नागपूरवरून प्रथमच रविवारी नवी मुंबईमध्ये आगमन झाले. नामदार गणेश नाईक यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
विमानतळावर नामदार गणेश नाईक यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले. नवी मुंबई नगरीत पोहोचल्यावर नामदार गणेश नाईक यांनी सर्वप्रथम ऐरोली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या अतिश बाजीत अतिशय उत्साही आणि जल्लोषात नामदार गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, युवा नेते संकल्प नाईक, सुनिकेत हांडेपाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मोठ्या संख्येने भेट घेऊन नामदार गणेश नाईक यांचे अभिनंदन केले.
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नामदार गणेश नाईक म्हणाले, १९९५ मध्ये मी वनखात्याचा मंत्री होतो. हे खाते सांभाळण्याचा पाच वर्षांचा अनुभव आहे. वनसंपदा वाढवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अधिकच्या सुधारणा आणि योजना राबविण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.