मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कॉंग्रेसची मागणी
मुंबई पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावातील पिंपळगाव गावठाण ते महाळुंगेसाठी रस्ता ग्रामीण क्रमांक २०७ वर झालेली अतिक्रमणे ताबडतोब काढण्याचे महसूल व ग्रामविकास विभागाला तातडीने निर्देश देण्याची लेखी मागणी नवी मुंबईतील प्रभाग ८५ चे कॉंग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावातील पिंपळगाव गावठाण ते महाळुंगेसाठी रस्ता ग्रामीण क्रमांक २०७ आहे. पिंपळगावच्या ग्रामस्थांना सावरगाव, नारायणगाव, घोडेगाव या ठिकाणी ये-जा करण्यासाठी, दळणवळणासाठी महत्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्याचा वापर केवळ गावचेच ग्रामस्थ नाही तर नारायणगाव, वारूळवाडी, गुंजाळवाडी, सावरगाव, घोडेगावचे ग्रामस्थ करतात, हा रस्ता सरकारदरबारी कागदोपत्री शासन नकाशानुसार हा रस्ता दोन किलोमीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा आहे. आता जर तुम्ही या रस्त्यावर येऊन पाहिले अथवा ड्रोन कॅमेऱ्याने या रस्त्याची पाहणी केली तर हा रस्ता केवळ कागदोपत्रीच राहीला असून रस्त्यावर सुरुवातीपासून शेवटपर्यत दोन्ही बाजूने सभोवतालच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केलेली आहेत. त्यामुळे कागदोपत्री १२ मीटरचा असलेला रस्ता अर्धाही राहिलेला नाही. याबाबत संबंधित गावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेकडे या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याविषयी वारंवार पाठपुरावा करुनही संबंधितांनी या मागणीकडे कानाडोळा करत एकप्रकारे अतिक्रमणाला खतपाणी घातले आहे. अंर्तगत वाहतुकीसाठी, शेतमालाची ने-आण करण्यासाठी, साखर कारखान्यांना ऊस नेण्यासाठी तसेच सुरळीत वाहतुकीसाठी, वाहतुक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्यावरील अतिक्रमणे ताबडतोब हटवून रस्ता अतिक्रमणमुक्त झाला पाहिजे, असे जीवन गव्हाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
सरकारने या रस्त्याच्या डागडूजीचे काम काढले आहे. मुळात रस्त्याचे काम कागदोपत्री जितका रस्ता आहे, त्यानुसारच काढले जाते. पण या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. म्हणजे जिथे रस्ताच नाही, त्या ठिकाणीही कागदोपत्री ऱस्त्याचे काम झाल्याचे दाखवून शासन दरबारी बिले मंजुर होण्याची शक्यता आहे. एकप्रकारे ही सरकारची फसवणूकच होण्याची भीती आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थ प्रशासनदरबारी सतत पाठपुरावा करत आहे. प्रशासन ग्रामस्थांना सहकार्य करत नाही. आपण समस्येचे गांभीर्य पाहता व भविष्यात रस्त्याची गरज पाहता व सद्य: स्थितीत रस्त्याचे महत्व लक्षात घेता आपण पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावातील पिंपळगाव गावठाण ते महाळुंगेसाठी रस्ता ग्रामीण क्रमांक २०७ वर दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे राज्याच्या महसूल विभागाला व ग्रामविकास विभागाला निर्देश द्यावेत. अतिक्रमण हटविण्यासाठी होत असलेल्या विलंबाविषयी जिल्हा परिषदेकडे विचारणा करावी. संबंधित रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्यावरच रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्याचे जिल्हा परिषद अथवा अन्य संबंधित शासकीय यंत्रणांना निर्देश देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.