राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानातील अंर्तगत भागातील लोखंडी संरक्षक जाळीला चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले टाळे तातडीने काढण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे एक निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या उद्यानात अंर्तगत भागात महापालिका प्रशासनाने डागडूजी करताना लोखंडी पिलर उद्यानाच्या अंर्तगत भागात लावले आहेत. चालण्याच्या ठिकाणी असलेल्या पायवाटेच्या बाजूला असलेल्या या लोखंडी पिलरच्या कंपाऊडला दोन ठिकाणी दरवाजे लावण्यात आले आहेत. तीनचार दिवसापासून उद्यानातील मुख्य प्रवेशद्वारच्या समोरच एका बाजूच्या दरवाजाला टाळे लावण्यात येऊन तो मार्ग बंद करण्यात आला आहे आणि ओपन जीमच्या बाजूकडील दरवाजा खुला ठेवण्यात आला आहे. ओपन जीमच्या बाजूने असलेला दरवाजा पूर्णपणे उघडतही नाही. एका छोट्या झाडामुळे तो दरवाजा अर्धवटच उघडला जातो. या ठिकाणी उद्यानात पाणी मारणारा पालिकेचा कर्मचारी पाणी न मारता केवळ पाण्याचा नळ सोडून देत असल्याने त्या ठिकाणी अनेकदा पाण्याचे डबके झालेले दिसून येते. सर्व चिखल होतो. त्यामुळे लोकांना उद्यानात जाणे अवघड होऊन स्थानिकांची गैरसोय होते. पाण्यातून जावून चिखल तुडवण्यापेक्षा उद्यानात न गेलेलेच बरे अशी भूमिका घेत स्थानिक रहीवाशी उद्यानात जात नाही. मुख्य प्रवेशद्वारालगत असलेल्या लोखंडी ग्रीलच्या दरवाजाला लावलेले टाळे तातडीने काढणे आवश्यक आहे. या ठिकाणी लहान मुलांची खेळणी आहेत. या ठिकाणी कुलुप असल्याने मुलांना उद्यानातील खेळण्यांवर खेळताही येत नाही. त्यामुळे स्थानिक रहीवाशी व सारसोळेचे ग्रामस्थ होत असलेल्या उद्यानातील गैरसोयीमुळे संतप्त झाले आहे. हे टाळे न उघडल्यास स्थानिक रहीवाशी व सारसोळेचे ग्रामस्थ हे टाळे तोडण्याची शक्यता आहे. स्थानिक जनतेत या टाळेप्रकरणामुळे उद्रेक झाला आहे. समस्येचे गांभीर्य पाहून आपण संबंधित ठिकाणी लावलेले टाळे काढण्याचे निर्देश देवून ज्या ठिकाणी दरवाजा उघडण्यास गैरसोय होत आहे. त्या ठिकाणी टाळे लावण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.