नवी मुंबई : नेरूळ पश्चिम परिसरातील अनधिकृत बॅनर व होर्डींग हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर ६,८,१०,१२,१४,१६, ए६ए, १८, १८ए, २०, २२, २६, २८ परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनर व होर्डींग अनधिकृतरित्या लागले आहेत. सेक्टर २८ नेरूळ जिमखाना ते नेरूळ सेक्टर २-८च्या मध्यभागी असलेल्या उड्डाणपुलापासून जुईनगर रेल्वे फाटकापर्यतच्या स्टेशन रोपर्यत या स्टेशन रोडला मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर व होर्डींग लागलेले आहेत. नेरूळ रेल्वे स्टेशन परिसर, पामबीचकडून नेरूळ सेक्टर ६ मध्ये शिरतानाचा चौक ते सेक्टर १८ मधील वजरानी स्पोर्टस क्लबपर्यतच्या मार्गावरही अनधिकृत बॅनर व होर्डींग लागलेले आहेत. नेरूळ सेक्टर ६,८,१०,१२,१४,१६, ए६ए, १८, १८ए, २०, २२, २६, २८ परिसरातील अंर्तगत भागातही तसेच सारसोळे बसडेपो परिसरातही हेच चित्र आहे. नेरूळ सेक्टर सहामध्ये तर पथदिव्यावर बिल्डरांच्या गृहनिर्माण प्रोजेक्टच्या होर्डींगने अतिक्रमण केले आहे. नेरूळ पश्चिमेला बाह्य रस्त्यावर तसेच अंर्तगत भागात अनधिकृत बॅनर व होर्डींगमुळे पालिका प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून परिसराला बकालपणा आला आहे. अशा वेळी या बॅनर व होर्डींगवर कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या नेरूळ विभाग कार्यालयाची भूमिका संशयास्पद वाटते. अनधिकृत बॅनर व होर्डींग लावून पालिकेचा महसूल बुडविणे, परिसराला बकालॅपणा आणणे याविरोधात बॅनर व होर्डींग लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ पश्चिम परिसरात अंर्तगत व बाह्य भागात असलेले तसेच पथदिपांवर लटकलेले अनधिकृत बॅनर व होर्डीग तात्काळ हटविण्याचे व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे नेरूळ विभाग कार्यालयाला आदेश द्यावेत व काय कारवाई केली याचा अहवाल मागवून घ्यावा. नेरूळ पश्चिम परिसराला बकालपणाच्या विळख्यातून मुक्तता करुन नेरूळवासियांना दिलासा देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.