भाजपाच्या पांडुरंग आमलेंची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील पदपथावरील फेरीवाल्यांवर तसेच सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानालगतच्या पदपथावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर अर्धवट कारवाई करुन तक्रारदारांचीच नावे फेरीवाल्यांना सांगणाऱ्या सानपाडा विभाग कार्यालयातील पालिका अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी भाजयुमाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सानपाडा विभागात आम्ही सामाजिक काम नि:स्वार्थीपणे करत असून संपर्कात आलेल्या लोकांची आम्ही कामे करत असतो. सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील पदपथावर तसेच सानपाडा सेक्टर सातमधील महापालिकेच्या सिताराम मास्तर उद्यानालगच्या पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे विभागातील नागरिकांना पदपथाऐवजी रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे. अपघात होत आहे. परिसराला बकालपणा आला आहे. याबाबत महापालिका सानपाडा विभाग कार्यालयात लेखी तक्रारी केल्यावर ठोस कारवाई न होता केवळ वरवरची नामधारी कारवाई होत आहे. कारवाई होण्यापूर्वी फेरीवाले गायब असतात, कारवाई संपताच अवघ्या पाचच मिनिटात फेरीवाले हजर होतात, हे न समजण्याइतपत सानपाडातील जनता वेडी नाही. फेरीवाल्यांकडून मिळणाऱ्या अर्थकारणाच्या मलिद्यामुळे सानपाडा विभाग कार्यालय फेरीवाल्यांना पोसत असल्याचे सानपाडामधील जनता उघडपणे बोलत असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
सानपाडा सेक्टर सातमधील सिताराम मास्तर उद्यानालगतच्या पदपथावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले असून त्यांना रस्त्यावरुन चालावे लागत आहे. यासंदर्भात सानपाडा विभाग कार्यालयात लेखी तक्रार केल्यावर ठोस कारवाई होत नाही. कारवाई अर्धवट सोडली जाते. मुळात कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त घेवून अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे पालिकेला अधिकार आहेत. पालिका कारवाई न करता फेरीवाल्यांना तक्रारदारांचेच म्हणजे आमचे नाव सांगते. फेरीवाल्यांना आमचे नाव समजतेच कसे? उद्या फेरीवाल्यांनी तसेच पालिका अधिकाऱ्यांनी संगणमताने बीडमधील सरपंच देशमुखसारखी आमची हत्या केली तर त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील सानपाडा विभाग कार्यालय जबाबदार असेल. परिसरातील बकालपणा व अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेकडे तक्रारी करणे हा गुन्हा असेल तर आम्ही सतत हा गुन्हा करणार? सानपाडा विभाग कार्यालयातून तक्रारदारांची नावे लिक होत असल्याने आज आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उद्या फेरीवाल्यांकडून आमच्यावर हल्लाही होण्याची भीती आहे. नावे कोण लीक करत आहे, याची चौकशी करुन संबंधितांना तातडीने निलंबित करून सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील पदपथ आणि सेक्टर सातमधील सिताराम मास्तर उद्यानालगतच्या पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.