नवी मुंबई (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीच्या दिनी जुन्नर तालुक्यातील पिंपळगावतर्फे नारायणगावमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाची भाविकांना प्रतिक्षा असते. बुधवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी पिंपळगावमध्ये महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यत हा कार्यक्रम चालणार असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजता रुद्राभिषेकाने महाशिवरात्री उत्सवास सुरुवात होणार असून ८ वाजता मांडव डहाळे व हारतुरे, ९.३० वाजता देवाची आळंदी येथील ह.भ.प श्रीकांत महाराज दुराफे यांचे किर्तन होणार आहे. सकाळी ११.३० वाजल्यापासून महप्रसादास सुरुवात होणार आहे. रात्री ९ वाजता श्रीराम प्रासादिक भजन मंडळाचा जागर होणार आहे.
कै. मारुती बापू चव्हाण यांच्या स्मरणार्थ योगेश देविदास चव्हाण यांच्या माध्यमातून भाविकांना अन्नदान केले जाणार आहे. जयेश खांडगेपाटील यांनी किर्तनसोहळ्याचे आयोजन केले आहे. पिंपळगावच्या ग्रामस्थ मंडळींकडून या महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शिवशक्ती मित्र मंडळ या सोहळ्याचे निमत्रंक आहे. या महाशिवरात्री उत्सवात पिंपळगाव तसेच सभोवतालच्या गावातील ग्रामस्थांनी भक्तीभावाने सहभागी व्हावे असे आवाहन शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष जयेश खांडगेपाटील यांनी केले आहे.