संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
शहर स्वच्छतेमध्ये नवी मुंबईकर नागरिकांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला असून लोकसहभागातून स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभाग कार्यालयाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून करावे येथील डोलाया समुद्रेश्वर सागरी किनारा परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये परिमंडळ उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री.नरेश अंधेर तसेच स्वच्छता निरीक्षक श्री. विजय नाईक यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्र यांनी सहभाग घेतला. यामध्ये विशेषत्वाने नमिता फिटनेस हब संस्थेच्या महिला पदाधिकारी व प्रतिनिधींनी उत्साही सहभाग घेतला. सर्वांनी मिळून खाडीकिनारा स्वच्छ करीत स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
त्याचप्रमाणे परिमंडळ 2 मधील प्लास्टिक विरोधी भरारी पथकाने सेक्टर 1, घणसोली येथील दुकाने यांची तपासणी केली असता रेखा स्वीट्स या दुकानात प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिक आढळल्याने त्यांच्याकडून 5 हजार रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलोपेक्षा अधिक वजनाचे एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच कोपरखैरणे येथील विनायक स्वीट मार्ट आणि बालाजी सुपर मार्केट यांच्याकडून प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्याबद्दल प्रत्येकी 5000 असा एकूण 10000/- दंड वसूल करण्यात आला.