मुंबई : कलानगरी कोल्हापूर मराठी फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये उत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून ‘थर’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या फिल्म फेस्टिवल महोत्सवामध्ये थर चित्रपटास पारितोषिक देण्यात आले. थर चित्रपटाचे निर्माते विलास चव्हाण यांनी वरिष्ठ नृत्य दिगदर्शक नरेंद्रजी पंडित यांच्या हस्ते स्विकारला. दहीहंडी हा सामाजिक विषय घेऊन या कथानकाने सर्वसामान्यांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला चांगले कथानक, आशय, समाजप्रबोधनात्मक संदेश आदी निकषावर या चित्रपटास या महोत्सवामध्ये उत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. १५ ऑगस्ट २०२४ रोजी नवी मुंबईमधील कोपरखैराणेतील बालाजी सिनेमागृहात या चित्रपटाचा प्रिमिअर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा नेते गणेश नाईक स्वत: उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक अमित मोहिते व सर्व कलाकार उपस्थित होते. महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहामध्ये थर चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला. कोकण भागातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून आलेल्या विलास चव्हाण या शिक्षकाने नेरूळमधील सेंट झेविअर्स शाळेमध्ये मुलांना शिकविताना आपल्या चित्रपट कलेची आवड जोपासली. फुलपाखरु, सोशल नेक्सेस, ऊर्जा या लघु चित्रपटांची विलास चव्हाण यांनी निर्मिती केली आहे. ते स्वत: चांगला अभिनय करत असून थर चित्रपटात त्यांनीच प्रमुख भूमिका रंगविली आहे. थर चित्रपटास मिळालेल्या यशाबाबत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाई्क व माजी आमदार संदीप नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.