नवी मुंबई : सानपाडा सिडको नोड, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात सार्वजनिक जागा, गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात तसेच बाहेरील परिसरात धुरीकरण अभियान सप्ताह राबविण्याची लेखी मागणी भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा परिसरातील सिडको सोसायट्याचा सानपाडा नोड, सानपाडा गाव आणि सानपाडा पामबीच परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागला असून स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले आहेत. स्थानिक रहीवाशांना सांयकाळी ६ नंतर सार्वजनिक उद्यानामध्ये बसणेही अवघड झाले आहे. इतकेच नाहीतर सोसायटीच्या आवारातही जेवण झाल्यानंतर शतपावलीही करता येत नाही. डासांमुळे सांयकाळनंतर दारे-खिडक्या बंद करुन घरात बसावे लागते. डासांच्या त्रासामुळे मलेरियासारखे आजार पुन्हा वाढीस लागले आहेत. सानपाडा नोड, सानपाडा गाव आणि सानपाडा पामबीच परिसरात डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने संबंधितांना गटारांमध्ये अळीनाशके टाकण्याचे व धुरीकरण करण्याचे तसेच उद्यान, क्रिडांगणे तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आतील व बाहेरील भागात तातडीने धुरीकरण करण्याचे संबंधितांना निर्देश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.