सुवर्णा खांडगेपाटील : Navimubailive.com@gmail.com
नवी मुंबई : घंटा गाडीवर गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या नाका कामगारांना मस्टरवर घेऊन अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनने कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियनने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने नवीन काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये या नाका कामगारांना सामावून घ्यावे आणि त्यांना अन्य कंत्राटी कामगारांप्रमाणे सेवेत सर्व सुविधा व वेतन देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनातून केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे व्यवस्थापन उपायुक्त वारुळे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रशासनाशी चर्चा करताना नाका कामगारांच्या समस्येचे गांभीर्य, असुविधा याची माहिती देताना या कामगारांना नव्या टेंडरमध्ये कंत्राटी कामगारांप्रमाणे समाविष्ट करुन घ्यावे, तसेच त्यांना वेतन व सुविधा द्याव्यात अशी मागणी केली.
यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी विभाग अध्यक्ष संजय सुतार, घनकचरा विभाग अध्यक्ष रविकुमार राठोड, बापुराव चव्हाण, निलेश घाडगे, रविकांत राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी नाका कामगारांबाबत चर्चा केली असून पालिका प्रशासन यावे लवकरच तोडगा काढेल आणि नाका कामगारांच्या समस्यांचे निवारण होईल, असा आशावाद कामगार नेते रविंद्र सावंत यांनी व्यक्त केला आहे.