जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाणी देयकाबाबत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश मोबाईल व्हॉटस-अप क्रमांकावरून प्रसारित होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक असल्याचे सांगत नागरिकांना ०९८३४२२५७६८ या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे. या क्रमांकावर संपर्क करा अन्यथा तुमचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल असा संदेश दिला जात आहे. परंतू हा संदेश नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रसारित करण्यात आलेला नसून दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक हा नवी मुंबई महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचा नाही. त्यामुळे या क्रमांकावर कोणीही संपर्क करु नये.
याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, त्यांनी पाणी देयके ही नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय तसेच अधिकृत पाणी देयक भरणा केंद्र या ठिकाणीच भरणा करावीत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन व पाणी देयकावरील QR कोडव्दारे पाणी देयके भरणा करावीत. तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.