जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेने २५ फेब्रुवारी रोजी पालिका शाळेतील जवळपास २२०० विद्यार्थ्यांना नेलेल्या खालापूर येथील इमॅजिका पार्क या ऍडव्हेंचर पार्क येथील सहलीत आयुष सिंग या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. २०१६ शासन निर्णयानुसार शैक्षणिक सहल ही ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक माहिती देणाऱ्या ठिकाणी नेण्यात यावी. या शासन निंर्णयाला केराची टोपली दाखवून हजारो मुलांना कडक उन्हात ऍडव्हेंचर पार्क मध्ये नेण्याचा अट्टाहास पालिका आयुक्त, शिक्षण विभाग उपायुक्त, शिक्षणाधिकारी यांनी केला. शिवाय बऱ्याच मुलांना जेवण, पाणी ही देण्यात आले नाही असे बरेच पालक म्हणत आहेत. शवविच्छेदन अहवालात जरी हृदयविकाराचा झटका असे नमूद असले तरी १४ वर्षीय आयुष सिंग ला मृत्यू होण्याची परिस्थिती निर्माण पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजपणामुळे झाली असा आरोप मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेवून केला.
महापालिकेने जवळपास १. ४५ करोड रुपयाचे २२९८५ पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी कंत्राट किडझेनिया यांच्याबरोबर केले. तर १८८६७ पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी इमॅजिका पार्क या ऍडव्हेंचर पार्क यांच्या सोबत २.२३ करोड चे कोणतीही निविदा न काढता केले. हे दोन्ही कंत्राट एकल स्त्रोत पद्धतीने काढताना पालिकेच्या शिक्षण विभागाने १ डिसेंबर २०१६ रोजी च्या उद्योग विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. मुळात याच शासन निर्णयात नमूद केले आहे की एकल स्त्रोत पद्धतीने पारदर्शकता राहत नाही. तसेच इमॅजिका सारखे थीम पार्क महाराष्ट्रात अनेक आहेत. किडझेनिया सारखे चिल्ड्रन्स पार्क ही अनेक आहेत. वेट एन जॉय, एस्सेल वर्ल्ड, टिकुजिनी वाडी, गोरेगाव चित्रपट सृष्टी थीम पार्क असे अनेक पर्याय असताना पालिकेने एकल स्त्रोत पद्धतीने कंत्राट देणे हा घोटाळा असल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला. दर मंगळवारी ९९९ रुपये हा दर इमॅजिका चा असताना सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्या मागे १११८ रुपये चे कंत्राट पालिकेने काढणे संशयास्पद आहे. इमॅजिका पार्क येथे कडक उन्हात नेलेल्या सहलीला अनेक विद्यार्थ्यांना जेवण दिले नसल्याचे समजते. मुळात पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळत नसल्याने पालिका अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक होते. पण पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या बरोबर बैठक ही न घेता केवळ कागदी आदेश देण्याचे काम केले. हा अक्षम्य हलगर्जी पणा पालिका अधिकाऱ्यांचा आहे. पालिका आयुक्त यांनी नेमलेल्या चौकशी समिती वर ही प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. उपायुक्त व शिक्षण अधिकारी यांचे निलंबन न करता अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमणे चूक होते असे ही नमूद करण्यात आले. शिक्षण विभाग संचालक व उप संचालक यांनी चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गजानन काळे यांनी केली.
या पत्रकार परिषदेस विद्यार्थी सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे उप शहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, मनसे नवी मुंबई शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, विद्यार्थी सेना उप शहरअध्यक्ष प्रतिक खेडकर, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तूर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील हे उपस्थित होते.