जयेश खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिडकोची महागृहनिर्माण योजना ‘माझे पसंतीचे घर’ २०२४ मध्ये लॉटरी विजेत्यांना मूळ जाहीर केलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. माजी आमदार संदीप नाईक यांनी यासंदर्भात सिडको प्रशासनाकडे लॉटरी विजेत्यांना योजनेच्या मूळ माहितीपत्रकात नमूद करण्यात आलेले क्षेत्रफळच देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
सिडकोने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी २६,००० घरांची लॉटरी जाहीर केली होती. यामध्ये पनवेल (प.), खारघर बस टर्मिनस, मानसरोवर रेल्वे स्थानक, खांदेश्वर रेल्वे स्थानक, खारकोपर सेक्टर १६-A आणि वाशी ट्रक टर्मिनस या ठिकाणी एलआयजी गटासाठी ३२२ चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिका जाहीर करण्यात आल्या होत्या. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे एलआयजी गटासाठी ३२२ चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिका देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, लॉटरी निकालानंतर लॉटरी विजेत्यांना मिळालेल्या Letter of Intent (LOI) मध्ये सदनिकेचा RERA Carpet Area २७.१२ चौरस मीटर (२९१.९१ चौरस फूट) इतका असल्याचे एलआयजी गटासाठी नमूद करण्यात आले आहे, जो मूळ घोषणा केलेल्या क्षेत्रफळापेक्षा जवळपास ३० चौरस फूट कमी आहे. माजी आमदार संदीप नाईक यांनी यावर आक्षेप घेत सिडको प्रशासनाने गृहनिर्माण योजनेच्या मूळ माहितीपत्रकात उल्लेख केलेल्या ३२२ चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिकाच लाभार्थ्यांना द्याव्यात, लॉटरी विजेत्यांना सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे क्षेत्रफळाच्या सदनिकाचं देण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या क्षेत्रफळापासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खबरदारी सिडकोने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नगरविकास विभाग आणि सर्व संबंधित विभागांकडे माजी आमदार संदीप नाईक यांनी या संदर्भात मागणी केली आहे.