नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : 8369924646
नवी मुंबई : महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने कर थकबाकी असलेल्या जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलाव मूल्यांकनासाठी अधिकृत शासकीय मूल्यकारांची (गर्व्हनमेंट व्हॅल्युअर्स) नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जप्तीची कारवाई प्रस्तावित असलेल्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ताकर त्वरित भरावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात येत आहे.
महापालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या विविध मालमत्तांवर ‘कर आकारणी व कर संकलन विभाग’ यांच्यामार्फत मालमत्ता कर आकारणी व वसूलीची कार्यवाही करण्यात येते. ‘मालमत्ता कर आकारणी पुस्तकात नोंद असलेल्या मालमत्तांच्या करांची देयके (बिल) ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’ प्रकरण ८ नियम ३९ नुसार तयार करण्यात येतात. विहित मुदतीत मालमत्ता कर देयकांची रक्कम न भरलेल्या मालमत्तेवर कलम १२८ व प्रकरण ८, नियम ४२ ते ४८ मधील तरतुदीनुसार जप्ती कारवाई करण्यात येते. या जप्त मालमत्तांवर लिलावाद्वारे विक्री कार्यवाहीची तरतूददेखील नियमानुसार करण्यात आलेली आहे.
थकीत मालमत्ताकराच्या वसूलीसाठी जप्त केलेल्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करणे व त्यासाठी मालमत्तेचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. मालमत्तेचे मूल्यांकन करण्याकरिता मनपा पॅनेलवर शासन नोंदणीकृत असलेल्या इच्छुक शासकीय मूल्यकारांची (गर्व्हनमेंट व्हॅल्युअर्स) नियुक्तीसाठी विविध वर्तमानपत्रांतून जाहीर प्रकटन करण्यात आले होते. या प्रकटनाला १० शासकीय मूल्यकारांनी प्रतिसाद दिला. त्यातील सुयोग्य शासकीय मूल्यकाराची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. परिणामी नजिकच्या काळात नेमून दिलेल्या मूल्यकारामार्फत मालमत्ताकार थकलेल्या जप्त मालमत्तेचे मूल्यांकन होणार आहे व त्यानंतरच मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्रीची प्रक्रिया जलद गतीने करण्यात येणार आहे.
वर्तमानपत्रातील जाहिर प्रकटनानुसार १० शासकीय मूल्यकारांचे स्वारस्य प्रस्ताव महानगरपालिकेस प्राप्त झालेले आहेत. तरी नागरिकांनी विहित मुदतीत कर देयकांचा भरणा तत्परतेने करावा व थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘अभय’ योजनेचा लाभ घ्यावा. ३१ मार्च २०२५ पर्यंत ‘अभय’ योजनेंतर्गत एक रकमी थकीत मालमत्ताकर भरून शास्तीवर ५० टक्क्यांची सूट मिळवावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कर थकल्यामुळे जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून कर रक्कम संकलित करण्याची प्रक्रिया नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत असल्याने त्याबाबतही थकबाकी रक्कम भरणा करण्याची कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे सूचित करण्यात येत आहे.