सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका समाजविकास विभागामार्फत विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्येही विविध घटकांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये शिष्यवृत्ती तसेच इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.
२०२४-२५ या वर्षाची शिष्यवृत्ती रक्कम याच वर्षात वितरित करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचेमार्फत देण्यात आले होते व त्याचा सातत्यपूर्ण आढावा आयुक्तांमार्फत घेण्यात येत होता. त्यातही विशेषत्वाने आयुक्तांच्या निर्देशानुसार हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारून त्यांच्या पडताळणीनंतर शिष्यवृत्ती रक्केमेचे वितरण गतीमानतेने ऑनलाईन पध्दतीने करण्यावर विशेष भर देण्यात आला.
शिष्यवृत्ती योजनेकरिता विविध ६ घटकांतर्गत ४३ हजार ७९१ एवढे अर्ज प्राप्त झालेले होते. या अर्जांची पडताळणी करुन त्यापैकी ३६ हजार १०४ लाभार्थींचे अर्ज योजनेच्या अटी / शर्तीनुसार पात्र ठरले. सदर पात्रता निश्चित झालेल्या ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांना २७ कोटी ९९ लक्ष ५७ हजार २०० रुपये एवढ्या रक्कमेच्या शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे करण्यात आले आहे.
विविध घटकांतील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येते.
अ. क्र. इयत्ता शिष्यवृत्ती
१. १ ली ते ४ थी पर्यंत (प्राथमिक) : चार हजार रुपये
२. ५ वी ते ७ वी पर्यंत (माध्यमिक) सहा हजार रुपये
३. ८ वी ते १० वी पर्यंत (उच्च माध्यमिक) आठ हजार रुपये
४. ११वी ते १२ वी पर्यंत (विद्यालयीन) नऊ हजार सहाशे रुपये
५. महाविद्यालयीन ते पदवी : १२ हजार रुपये
६. पदवीनंतरचे शिक्षण १६ हजार रुपये
७. तांत्रिक / व्यवसाय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी: आठ हजार रुपये
सदर योजना ही खाजगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाव्यतिरिक्त शिक्षण घेणाऱ्या ८ लाखांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता असून याव्यतिरिक्त मागासवर्गीय विद्यार्थी, स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी, महापालिका आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांची मुले, विधवा – घटस्फोटित महिलांची मुले तसेच महापालिका क्षेत्रातील दगडखाण – बाधकाम – रेती – नाका कामगारांची मुले यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात आहे.
या शिष्यवृत्तीद्वारे विद्यार्थी, पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चात मोठ्या प्रमाणात मदत होते. त्या अनुषंगाने या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती रक्कमेचे वितरण आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून झाल्याने सुनियोजितता, पारदर्शकता व गतीमानता प्राप्त होऊन विहित वेळेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कमेचे वितरण झालेले आहे. याबद्दल विद्यार्थी, पालक यांच्यामार्फत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.