सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail,com
मुंबई : तगड्या फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायर्झस हैदराबादला गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी २०१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला सनरायर्झसचा संघ १६ षटके ४ चेंडूत अवघ्या १२० धावांमध्ये गुंडाळला गेल्याने केकेआरने ८० धावांनी दणदणीत विजय मिळविला. कोलकाताने हा सामना जिंकत यंदाच्या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. मात्र सनरायझर्स हैदराबादचा सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. त्यातही वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ३ बळी घेत सनरायझर्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडताना कमालीची गोलंदाजी केली. काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबादने आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध स्वीकारला.
नितीशकुमार रेड्डी १९ धावा, कमिन्दु मेंडिस २७ धावा, हेनरिक क्लासेन ३३ धावा, कर्णधार पॅट कमिन्स १४ धावांचा अपवाद वगळता इतर ७ फलदांजाना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. काव्या मारनच्या हैदराबादचा भक्कम फलंदाजीचा बंगला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी (३ एप्रिल) १५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्स खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सुरुवातीला हैदराबादच्या गोलंदाजांनी योग्यही ठरवले होते. कोलकाताकडून क्वींटन डी कॉक आणि सुनील नरेन यांनी सलामीला फलंदाजी केली.
पण डी कॉकला दुसऱ्याच षटकात कमिन्सने झीशन अन्सारीच्या हातून १ धावेवर बाद केले. त्यापाठोपाठ पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने सुनील नरेनचा अडथळा दूर केला. त्याने त्याला यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेनच्या हातून ७ धावांवर झेलबाद केले.
पण नंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी डाव सावरला. रहाणे सयंमी खेळत होता, तर रघुवंशीने आक्रमण केले. त्यामुळे त्यांच्यात ८१ धावांची मोठी भागीदारीही झाली. अखेर ही भागीदारी धोकादायक ठरत असतानाच रहाणेला झीशन अन्सारीने बाद केले. क्लासेनने त्याचा झेल घेतला. रहाणेने २७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३८ धावांची खेळी केली. नंतर रघुवंशीने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याला अर्धशतकानंतर कामिंडू मेंडिसने बाद केले. त्याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. शेवटी वेंकटेश अय्यर आणि रिंकु सिंग यांनी वादळी खेळ केला आणि संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. अवघ्या ४१ चेंडूत रिंकू सिंग व व्यंकटेश अय्यर यांनी ९१ धावाची भागीदारी केली .
वेंकटेशने १९ व्या षटकात पॅट कमिन्सविरुद्ध ४, ६,४,४, २,१ अशा धावा चोपल्या. यासह त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते. २० व्या षटकाची सुरुवातही वेंकटेशने षटकार आणि चौकाराने सुरुवात केली होती. पण तिसऱ्या चेंडूवर त्याला हर्षल पटेलने बाद केले. त्याने २९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावांची खेळी केली. अखेरच्या चेंडूवर आंद्र रसेल धावबाद झाला. रिंकु सिंग १७ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३२ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे कोलकाताने २० षटकात ६ बाद २०० धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, झीशन अन्सारी, हर्षल पटेल आणि कामिंडू मेंडिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.