अनंतकुमार गवई
नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये विविध नागरी समस्या असतानाही समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून चालढकलपणा केला जात असल्याने सानपाडावासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी या समस्या निवारणासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला आहे. पांडुरंग आमले यांनी लेखी पाठपुराव्यानंतर तुर्भे विभाग कार्यालयातील उपअभियंता अजय पाटील, कार्यकारी अभियंता देशमुख यांची भेट घेऊन समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून त्यांनी लवकरच या नागरी समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे.
सानपाडा सेक्टर दोनमध्ये रस्त्यावर असणाऱ्या ड्रेनेजच्या झाकणांची समस्या गंभीर होती. झाकणे वरखाली असल्याने व रस्त्याशी समान पातळीवर नसल्याने येथे अपघात होत होते. त्यामुळे ही मल:निस्सारन वाहिन्यांची झाकणे (चेम्बर्स) समान पातळीवर असणे आवश्यक नसते. रस्त्यावर भरधाव वेगाने परिसरात दुचाकी धावत असल्याने अपघात होतात. या ठिकाणी गतीरोधक बसल्यास अपघातांना आळा बसेल. रस्त्यावर खड्डे असल्यानेही अपघात होत आहेत. परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली भिंतीची रंगरंगोटी केली जात असली ते काम योग्य रितीने होत नाही. रंगावर रंग चढविला जात असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. याशिवाय अन्य नागरी समस्याही गेल्या काही महिन्यांपासून जैसे थेच होत्या. भाजपा पदाधिकारी पांडुरंग आमले यांनी सातत्याने लेखी पाठपुरावा करुनही समस्येचे निवारण न झाल्याने अखेरिला आमले यांनी महापालिका विभाग अधिकारी कार्यालयात जावून अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे सुरु केले. आमदार मंदाताई म्हात्रे यांनाही सानपाडा नोडमधील नागरिकांच्या समस्या सांगितल्या. पालिका अधिकाऱ्यांनी पांडुरंग आमले यांना दोनच दिवसामध्ये सानपाडा नोडमधील नागरी समस्या निवारणाची मोहीम हाती घेण्याचे आश्वासन दिले आहे.