नवी मुंबई : उबाठा शिवसेनेमध्ये नवी मुंबई शहरामध्ये होत असलेली पडझड अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील उबाठा शिवसेनेतील अधिकाधिक शिलेदार, माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये रममाण झालेले असले तरी बेलापूर विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेना आपले अस्तित्व टिकवू आहे. माजी शहरप्रमुख, माजी विरोधी पक्षनेते शिंदेंच्या शिवसेनेत कार्यरत झाले असले तरी काही महत्वाच्या नगरसेवकांमुळे बेलापुर विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेपेक्षा उबाठा शिवसेनेचा दरारा जनसामान्यांमध्ये ठळकपणे उठून पहावयास मिळत आहे. उबाठा शिवसेनेतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेकडून मारल्या गेलेल्या प्रेमळ सादेला उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांनी तितकाच प्रेमळ प्रतिसाद दिला असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाची केवल औपचारिकताच आता शिल्लक राहीलेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे उबाठा शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची पाऊले वळली असली तरी बोनकोडेच्या युवा नेतृत्वाकडे या माजी नगरसेवकातील अनेक जण आजही आशेने पाहात असलेले खासगीतील चर्चेत दिसून येत आहे. त्यामुळेच उबाठा सेनेचे शिलेदार निघाले ठाण्याकडे, मात्र नजरा अजूनी वळती बोनकोडेकडे अशी अवस्था उबाठा शिवसेनेतील माजी नगरसेवकांची झालेली आहे.
उबाठा शिवसेनेचे सध्याचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाला मर्यादा पडल्याने त्यांना उबाठा शिवसेनेची संघटना बांधणी करता आलेली नाही अथवा उबाठा शिवसेनेतील पडझड रोखण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोप उबाठा शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून तसेच शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीकडून संदीप नाईकांनी बेलापुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मोर्चेबांधणीसाठी कमी वेळ मिळाल्याने संदीप नाईकांना अल्पशा मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. प्रचारयंत्रणा राबवित असताना उबाठा शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवकांचा संदीप नाईकांशी संबंध आला व तो संबंध जिव्हाळ्याचा बनला. त्यामुळे उबाठा शिवसेनेतील अनेक नगरसेवक संदीप नाईकांनी ‘प्रेमाचा निरोप’ धाडल्यास आम्ही ठाण्याकडे न जाता कायमस्वरुपी बोनकोडेचे नेतृत्व मान्य करु असा सूर आळवू लागले आहेत. शिंदे शिवसेनेकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून प्रवेश करणाऱ्या उबाठा शिवसेनेतील नगरसेवकांची तयारी जवळपास पूर्ण झाली असून ‘प्रेमळ संदेशा’चाही त्यांनी स्विकार केला आहे. जुईनगरमधील एक व नेरूळमधील एक असे उबाठा शिवसेनेतील दोनजण अजून शिंदेच्या शिवसेनेच्या जाळ्यात अडकले नसले तरी ते लवकरच शिंदेंच्या ठाण्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहा-सात महिन्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत युती, आघाडी, मैत्रीपूर्ण लढती याबाबत स्थानिक नेतेच निर्णय घेत असल्याने वरिष्ठ पातळीवरील नेतेदेखील याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवत असतात. शिंदेंच्या शिवसेनेची व भाजपाची राष्ट्रीय व राज्य पातळीवर युती असून केंद्रात व राज्यात ते महायुतीमध्ये सहभागी आहेत, असे असले तरी शिंदेंच्या शिवसेनेतील नेतृत्व व भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेतृत्व यांच्यात विळ्याभोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकीत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होण्याची शक्यता कमीच आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपा उमेदवारांच्याविरोधात ऐरोलीतून शिंदेंच्या शिवसेनेचे मातब्बर नेते विजय चौगुले आणि बेलापूरातून शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविली होती.
शिंदेंच्या शिवसेनेतील विजय चौगुले, विजय नाहटा, किशोर पाटकर यासह अनेकांचे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाशी राजकीय वाद असल्याने शिंदेंची शिवसेना जागावाटपात सन्मानजनक युती न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याची अधिक शक्यता आहे. नवी मुंबईतील भाजपा नेतृत्वालाही स्वबळावर भाजपाच्या सत्तेचा विश्वास असल्याने जागावाटपात ते शिंदेंच्या शिवसेनेला झुकते माफ देण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे महाआघाडी, शिंदेंची शिवसेना आणि भाजपा अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेतील सर्वच नगरसेवक आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिंदेंची शिवसेना कार्यरत झाली असून बेलापूर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेतील अधिकाधिक नगरसेवक कोणत्याही क्षणी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. जुईनगरमधील एक व नेरूळमधील एक उबाठा शिवसेनेचा नगरसेवक अजूनही शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी फारसा इच्छूक नसल्याची नवी मुंबईच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. शिंदेंच्या शिवसेनेत न जाता भाजपात जावून स्थानिक नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा सूर काही नगरसेवकांकडून आळविला जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी निघालेल्या संबंधित नगरसेवकांना अडवण्यासाठी भाजपा काही खेळी करणार का अथवा या नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेत जाऊ देणार, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.