अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. लाडक्या बहिणी, एसटी कामगार व शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथील हरिदास विश्वंभर बोंबले यांनी केलेली आत्महत्या ही सरकारने घेतलेला बळी असून शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा युती सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील हरिदास बोंबलेची आत्महत्या ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली. अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने दिलेली नाही, कोणतीही सरकारी मदत नाही आणि कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही, यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. हे आंधळे, बहिरे व मुके सरकार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फिरण्यापेक्षा मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे व शेतकऱ्यांना मदत करावी. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, रोजगार नसल्याने गावातून लोक शहराकडे पलायन करत आहेत, पिण्यासाठीही पाणी नाही. जलजीवन योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले असून ही योजनाच भंकस आहे पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही असेही सपकाळ म्हणाले.
खा. उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?
भाजपा खासदार उदयनराजे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करा, अशी केवळ मागणी करून काय उपयोग. ते ज्या पक्षाचे खासदार आहेत, तो भाजपा गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकाला संविधानापेक्षा जास्त महत्व देतो. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केलेले आहे, त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी खासदार उदयनराजे यांनी केली असती तर बरे झाले असते. उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
‘एमपीएससी’चा पुन्हा गोंधळात गोंधळ…
एमपीएससी ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सातत्याने खेळ करत आहे. २०२३ साली परिक्षेची जाहिरात आली त्यानंतर २०२४ मध्ये पूर्व परिक्षा झाली आणि त्याचा निकाल आला. आर्थिक मागास प्रवर्ग नसल्याने मुख्य परिक्षा देण्यासाठी एक अर्ज भरावा लागत आहे पण एमपीएसचे पोर्टलच सारखे बंद असते, हे पोर्टल बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी, पारदर्शक प्रक्रिया राबवा अथवा ऑफलाईन एक खिडकी योजना राबवून फॉर्म भरुन घ्या, त्यानंतर नोटीफिकेशन काढून ४५ दिवसांनंतर परिक्षा घ्या. पण एमपीएससीला परीक्षेची खूपच घाई झालेली दिसत आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु केलेला खेळ थांबवावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीवर चर्चा व्हायला हवी.
ईव्हीएम सहजपणे हॅक करून निवडणूक निकालांमध्ये फेरफार करता येतो असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी म्हटले आहे यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जगातील अनेक प्रगत देशातही ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. ईव्हीएम संदर्भात खूप आक्षेप आहेत, त्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे पण भारतीय निवडणूक आयोग त्यावर गप्प आहे उत्तर देत नाही. ईव्हीएम व मतदारयाद्या घोटाळ्याप्रश्नी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाला वारंवार भेटत आहे. Vvpat ची मतमोजणी करावी ही मागणीही आम्ही केली होती. पण निवडणूक काहीच बोलत पण मुख्यमंत्री फडणवीस त्यावर उत्तर देत आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असली पाहिजे. आता अमेरिकेनेही ईव्हीएमवर मोठा सवाल उपस्थित केला असल्याने चर्चा झाली पाहिजे. पंतप्रधान, भाजपा व एनडीए सरकारने यावर बोलले पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.