नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन, चार व जुईनगर नोडमधील पदपथावर असलेल्या सिमेंटच्या चेम्बर्सची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त आणि नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरुळ सेक्टर दोन आणि चार तसेच जुईनगर नोडमधील पदपथावर असलेल्या सिमेंटच्या चेम्बर्सची झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. या अर्धवट तुटलेल्या चेम्बर्सच्या झाकणामध्ये पादचाऱ्यांच्या चपला अडकून ते पडले आहेत व त्यांना शारीरीक जखमाही झाल्या आहेत. सिमेंटच्या तुटलेल्या चेम्बर्सच्या झाकणामुळे पादचाऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झालेला आहे. याशिवाय या तुटलेल्या झाकणातून झुरळे, डास व अन्य किटकांच्या खुलेआम वावर सुरु असल्याने पादचाऱ्यांना साथीच्या आजारांचीही लागण होत आहे. याशिवाय परिसराला बकालपणाही आलेला आहे, समस्येचे गांभीर्य पाहता, नेरुळ सेक्टर दोन, चार तसेच जुईनगर नोडमधील पदपथावरील तुटलेल्या सिमेंटच्या चेम्बर्सची तातडीने दुरुस्ती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.



