जयेश खांडगेपाटील : Navimumbaiive.com@gmail.com
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम २०२५-२०२६ करीताचे मील रोलरचे पुजन सर्व संचालक मंडळ सदस्यांचे उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाल्याची माहिती विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितली.
यावेळी चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले आदिंसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शेरकर म्हणाले की, आगामी गाळप हंगाम २०२५-२०२६ साठी मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ऑक्टोबर महिन्यामध्ये विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर सहवीजनिर्मीती व डिस्टीलरी प्रकल्पांची कामेही वेगामध्ये सुरु आहेत. यंदा ऊस लागवडीकडे शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर कल असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विघ्नहर कारखान्याची बेणे पुरविण्याची प्रक्रिया सुरु असून शेतकऱ्यांचा आडसाली ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५००० मे.टना वरुन ७५०० मे.टन झाल्याने गाळप हंगाम सन २०२५-२६ पासुन कारखाना प्रतीदिन ८५०० ते ९००० मे.टन ऊसाचे गाळप करणार आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आडसाली ऊसाबरोबर पूर्वहंगामी व सुरु ऊसाची लागवड ही मोठ्या प्रमाणात करावी, जेणेकरुन ऊस तोडणीचे नियोजन योग्यप्रकारे करता येईल, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे कारखान्यामार्फत हिरवळीचे खत म्हणून ताग बियाणे तसेच विघ्नहर कृषी अमृत सेंद्रिय खताचे वाटप सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादकांनी याचा आवश्यक फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.
ते पुढे म्हणाले की, आगामी गाळपासाठी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड होत असून त्यापासून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होणार असल्याने आगामी २०२५-२०२६ च्या ऊस गाळप हंगामात विघ्नहर कारखान्याचे सुमारे १३ लाख मे.टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुक लेबरचे नियोजनानुसार कराराचे काम चालु आहे. त्याचबरोबर विघ्नहर कारखान्याचा ६५ केएलपीडी क्षमतेचा महत्वकांक्षी असा डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जाणार असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी सांगितले.



