सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbaiive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना त्यामध्ये सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छतेकडेही नियमित लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये अधिक भर घालत आज रविवार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या शौचालयांमध्ये ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शौचालयांची अंतर्गत स्वच्छता करण्यात आलीच शिवाय आसपासचा परिसरही सखोल स्वच्छ करण्यात आला. यासाठी स्प्रेईग जेटचा वापर करण्यात आला तसेच निर्जंतुकीकरणही करण्यात आले. शेवाळ झालेल्या ठिकाणी पावडर टाकून आसपासचा निसरडा परिसर स्वच्छ करण्यात आला.
१ जुलैपासून सुरू झालेल्या ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये दररोज स्वच्छता आणि आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभराचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये रविवारी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. काही ठिकाणी नागरिकही या मोहीमेत उत्साहाने सहभागी झाले.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ उपआयुक्त संजय शिंदे यांच्या माध्यमातून, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी अरुण पाटील, वाशी विभागाचे सहा.आयुक्त सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ, तुर्भे विभागाचे सहा.आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी राजुसिंग चव्हाण, घणसोली विभागाचे सहा. आयुक्त उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी विजय पडघन, ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, दिघा विभागाचे सहा.आयुक्त नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी प्रविण थोरात यांनी आपल्या विभाग कार्यालयातील सहकारी तसेच स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि शौचालयातील स्वच्छताकर्मी व नागरिक यांच्या सहयोगातून या सखोल स्वच्छता मोहीमा यशस्वीपणे राबविल्या.



