राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी महादेव पवारांचा संताप
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या उद्यान व क्रिडांगणासभोवताली असणाऱ्या मॉर्निग वॉकच्या मार्गिकेवर आणि ओपण जीमच्या परिसरात ब्लिचिंग पावडरची तात्काळ फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.
याच समस्या निवारणासाठी आपणास दि. १० जुलै २०२५ तसेच दि.१४ जुलै २०२५ रोजी तक्रारपत्र दिले होते. आपणाकडून निवेदन तात्काळ संबंधितांना पाठविण्यात आले. तथापि आजतागायत दखल घेण्यात आलेली नाही. बुधवार, दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी या उद्यानात तब्बल सहा जण सकाळी ७ ते ७.४०च्या दरम्यान निसरड्या जागेवरुन (शेवाळलेल्या) पडले आहेत. एका महिलेच्या डोक्याला चांगलाच मार लागला आहे. एकतर त्या ठिकाणी सफाई महापालिकेकडून होत नाही. मॉर्निग वॉकच्या जागेवर , ओपन जीम परिसरात झाडांचा पालापाचोळा पडला असल्याने शेवाळलेल्या लाद्या दिसत नाही. आज मोठ्या दुर्घटना घडल्या. उद्या कोणाचा हात-पाय मोडला तर उपचाराचा खर्च कोण करणार आणि गुन्हा कोणावर दाखल करायचा, याचे लेखी उत्तर आपणाकडून मिळावे, अशी विचारणा करत महादेव पवार यांनी निवेदनातून आपला संताप व्यक्त केला आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आणि राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यान व क्रिडांगणसभोवताली मॉर्निग वॉकसाठी मार्गिका आहे. तसेच क्रिडांगणाच्या एका कोपऱ्यावर ओपण जीम असून सकाळी स्थानिक रहीवाशी, विशेषत: ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी व्यायाम करत असतात. संततधार पावसामुळे मॉर्निग वॉकच्या पायवाटेवर व ओपण जीमच्या ठिकाणी शेवाळ साचण्यास सुरुवात झाल्याने या ठिकाणी निसरडा परिसर झाला आहे. महिला घसरुन पडण्याच्या घटना घडू लागल्याने समस्येचे गांभीर्य या निवेदनातून आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. अन्य मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून आपण या मार्गिकेवर व ओपण जीम परिसरात तातडीने ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.



