गोवंडीचा गायकवाड फेरीवाल्यांकडून हफ्ते गोळा करतोय तर पालिकेचे अधिकारी गायकवाड कारवाईस टाळाटाळ करताय.
सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील आवारात, कियॉस्कसमोरील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या फेरीविक्रत्यांची समस्या नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उदासिनतेमुळे भस्मासूरागत फोफावत चालली आहे. स्टेशनबाहेरील परिसराला बकालपणा आला असून सानपाडावासियांना घरी ये-जा करण्यासाठी फेरीवाल्यांचा अडथळा ओंलाडावा लागत आहे. सानपाडा भागातील भाजपाचे नेते व बेलापूरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कडवट, निकटवर्तीय समर्थंक पांडूरंग आमले फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका विभाग कार्यालय ते महापालिका मुख्यालय सातत्याने पाठपुरावा करत असताना आमदाराच्या समर्थक करत असलेल्या पाठपुराव्याला महापालिकेचा अतिक्रमण विभाग केराची टोपली दाखवत आहे. या फेरीवाल्यांकडून गायकवाड नावाचा इसम दररोज हफ्ते गोळा करुन त्यांच्यावर कारवाई होऊन देत नसल्याची माहिती फेरीवालेच उघडपणे देत आहेत. पालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांचे कर्मचारी या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करत नाहीत. त्यामुळेच सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना कोणत्या गायकवाडचा ‘आशिवार्द’ आहे, असा खुलेआमपणे प्रश्न करत सानपाडावासिय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अकार्यक्षमतेबाबत संताप व्यक्त करत आहेत.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेर असलेले रस्ते, पदपथावर फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हा वादाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची धुरा काही दिवसांपूर्वीच डॉ. कैलास गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली. कैलास गायकवाडांसारखा खमक्या अधिकारी अतिक्रमण विभागाच्या प्रमुखपदी येताच काही तरी वेगळे घडेल, असा आशावाद व्यक्त केला जात होता. सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई करुन ठोस तोडगा काढेल, सानपाडावासियांची बकालपणातून मुक्तता करेल, असा आशावाद सानपाडावासियांकडून व्यक्त करण्यात येत होता. परंतु अतिक्रमण उपायुक्त कैलास गायकवाड यांनीही येथील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यास फारसे स्वारस्य दाखविले नाही.
भाजपाचे सानपाडा नोडमधील नेते व आमदार मंदाताई म्हात्रे यांचे समर्थंक असलेले पांडूरंग आमले हे सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेली अनेक महिने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सातत्याने करत आहेत. आमदारांचे जवळचे कार्यकर्ते असतानाही पालिका प्रशासन त्यांच्या मागणीला डावलून फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला खतपाणी घालत असल्याची उलटसूलट चर्चा सानपाड्यात सुरु झालेली आहे. आमदार मंदा म्हात्रेदेखील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी पालिका आयुक्तांना सूचना का करत नाही, अशी विचारणाही सानपाडा जनतेकडून करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीत मंदाताई म्हात्रेंना मतदान करुनही फेरीवाल्यांची समस्या सुटत नसेल तर त्यांना मतदान करुन आम्ही चूक केली काय? असा निराशेचा सूर सानपाडावासियांकडून आळविला जात आहे.
फेरीवाल्यांकडून गायकवाड नावाचा इसम दररोज हफ्ते गोळा करत असल्याची फेरीवाला अतिक्रमण परिसरातच चर्चा होत आहे. हा गायकवाड कोणी गोवंडीला तर कोणी तुर्भ्याला राहत असल्याचे सांगतात. या गायकवाडमुळेच फेरीवाल्यांवर कारवाई न होता आजवर त्यांना पालिका प्रशासनाकडून आजवर अभय देण्यात आलेले आहे. योगायोगाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तपदाची धुराही कैलास गायकवाड यांच्याकडेच आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण व पांडूरंग आमलेंचा पाठपुरावा आणि भाजपाच्या पाठपुराव्याला महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली हा नवी मुंबईतील आता बहूचर्चित विषय झालेला आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांच्याकडून फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस कार्यवाही केली जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनापर्यंत सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण व हे अतिक्रमण हटविण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांकडुन करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याला महापालिकेचा अतिक्रमण विभाग जुमानत नसल्याची माहिती पोहोचली आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत आहे. पालिका अतिक्रमण काढण्यासाठी लक्ष देत नाहीत. भाजपाच्या पांडूरंग आमले अतिक्रमण हटविण्यासाठी करत असलेला पाठपुरावा आजही करतच आहेत. त्यामुळे सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना नेमक्या कोणत्या ‘गायकवाड’चा आशिर्वाद आहे, अशी चर्चा सानपाडा परिसरात होत आहे.



